Mon, Mar 08, 2021 17:45
बारामती: वैद्यकिय अधिकारी-कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, दोघांविरोध गुन्हा

Last Updated: Jan 12 2021 4:41PM

संग्रहित छायाचित्रबारामती : पुढारी वृत्तसेवा

येथील सिल्व्हर ज्युबिली शासकिय उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकिय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की आणि मारहाण केली आहे. या दरम्यान आलेल्या सरकारी कामकाजात अडथळाप्रकरणी दोघाजणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप सावंत (रा. मळद, ता. बारामती) आणि अक्षय सुनील गुंजवटे (रा. नेवसे रोड, बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 

याबाबत वैद्यकिय अधिकारी अक्षयकुमार दत्तात्रय जरांडे (रा. अवधूत प्लाझा, अशोकनगर, बारामती) यांनी फिर्याद दिली. सोमवारी (दि. ११) रोजी रात्री नऊ वाजता ही घटना घडली. अक्षयकुमार जरांडे हे सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकिय अधिकारी म्हणून काम पाहतात. तेथे सुरु असणाऱ्या कोविड केंद्रात रुग्णांना दाखल करून घेणे, त्यांच्यावर उपचार करण्याची जबाबदारी डॉ अक्षयकुमार जरांडे यांच्याकडे आहे. सोमवारी रात्री ते परिचारिका संगीता लोखंडे, वॉर्डबॉय चंद्रकांत दळवी, लता भिसे, सुरक्षारक्षक विकास शिंदे, नीलेश म्हेत्रे हे ड्युटीवर असताना संदीप सावंत हा तेथे एका महिलेला उपचारासाठी घेवून आला. अक्षयकुमार जरांडे यांनी या महिला रुग्णांची ऑक्सिजन पातळी तपासली. ती सामान्य असल्याने आणि सिल्व्हर ज्युबिली हे कोविड केंद्र असल्याने पुढील उपचारासाठी एमआयडीसीतील शासकिय महिला रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. याचा राग आल्याने संदीप सावंत याने मी प्रेसचा माणूस आहे, तुम्ही इथेच उपचार करा, असे म्हणत डॉक्टरांशी   हुज्जत घातली. याच दरम्यान मोबाईल काढून व्हिडीओ शुटींग सुरु करत तुम्ही कॅमेऱ्यासमोर उपचार होत नसल्याचे सांगा, अशी मागणी संदीप सावंत याने केली. वॉर्डबॉय चंद्रकांत दळवी यांनी संदीप सावंत यांची समजूत घालत असताना संदीपने हाताने मारहाण करत शिविगाळ केली. या दरम्यान संदीप सावंत याच्यासोबत आलेली महिला रुग्ण आपण महिला रुग्णालयात जावून उपचार घेवू असे सांगत होती. 

अधिक वाचा : युवक दिन विशेष : सोशल मीडियावर व्यक्त होणं हीच ठरतेय चळवळ

दरम्यानच्या काळात संदीप सावंत याने मित्र अक्षय सुनील गुंजवटे याला फोन करून तेथे बोलावून घेतले. या दोघांनी दळवी, शिंदे आणि म्हेत्रे यांच्याशी झटापट करून धक्काबुक्की आणि मारहाण केली. त्यामुळे चंद्रकांत दळवी हे एका खोलीत जावून दरवाजा बंद करून बसले. यावेळी दरवाजावर लाथा मारत तुम्ही बाहेर या, नोकरी कसे करता तेच बघतो. असे म्हणत या दोघांनी तेथे धिंगाणा घालत सरकारी कामात अडथळा आणला.

अधिक वाचा : 'प्रत्यक्ष चळवळीसाठी हवा सोशल मीडियाचा उपयोग' 

या दरम्यान रुग्णालयाकडून या घटनेची माहिती शहर पोलिस ठाण्याला देण्यात आली. पोलिस येत असल्याचे पाहून संदीप सावंत हा तेथून पळून गेला. यानंतर शहर पोलिसांनी अक्षय गुंजवटे याला ताब्यात घेवून शहर पोलिस ठाण्यात नेण्यात आले.