Thu, Aug 13, 2020 16:32होमपेज › Pune › पुणे : खंडणी उकळणाऱ्या पोलिसासह आठ जणांवर मोक्का

पुणे : खंडणी उकळणाऱ्या पोलिसासह आठ जणांवर मोक्का

Last Updated: Jul 02 2020 7:00PM
पुणे : पुढारी वृत्तसेवा

दहा लाखांच्या खंडणीसाठी डॉक्टरचे अपहरण करून ५ लाख ८९ हजारांची खंडणी उकळणार्‍या आठ जणांच्या टोळीवर महाराष्ट्र राज्य संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आली. या टोळीत शहर पोलिस दलातील एका कर्मचार्‍यासह आठ जणांचा समावेश आहे. तर बारामतीची महिला रंजना तानाजी वनवे ही या टोळीची मुख्य सूत्रधार असून, अद्याप ती फरार आहे. अशाच प्रकारे या टोळीने इतर ठिकाणी देखील गुन्हे केल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे.

अधिक वाचा : पुणे : इंदापूर तालुक्यात एकाच दिवशी १३ जण पॉझिटिव्ह 

गर्भलिंग निदान चाचणी केली नसतानाही ती केल्याचे भासवून ब्लॅकमेल करीत दहा लाखांच्या खंडणीसाठी हडपसर परिसरातून या टोळीने एका डॉक्टरचे अपरहण केले होते. याप्रकरणी खंडणी व अमली पदार्थ विरोधी पथकाचे निरीक्षक राजेंद्र मोहिते यांच्या पथकाने स्वयंघोषित पत्रकार प्रदीप ज्ञानदेव फासगे (३७, रा. मांजरी), कैलास भानुदास अवचिते (३८, रा. हडपसर), पोलिस कर्मचारी समीर जगन्नाथ थोरात (रा. हडपसर), आरती प्रभाकर चव्हाण (२९, फुरसुंगी), चौघांना अटक केली. तर पवार नावाच्या आणखी एकाला सांगलीतून नुकतेच ताब्यात घेतले आहे.

अधिक वाचा : सारथी संस्‍था बंद पडू देणार नाही : वडेट्टीवार (व्हिडिओ)

रंजना वणवे ही सराईत गुन्हेगार असून, खंडणीच्या जाळ्यात अडकविण्यात तिचा हातखंडा असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तिच्यावर पाच गुन्हे दाखल असून, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यामधील एका डॉक्टरला जाळ्यात फसविल्यानंतर तिने पुण्यातल्या डॉक्टरला खंडणीसाठी जेरीस आणले होते. दरम्यान, तिने टोळी तयार करून डॉक्टरांना आपल्या जाळ्यात खेचत असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार मोक्काअंतर्गत कारवाईसाठी सहाय्यक पोलिस आयुक्त शिवाजी पवार यांनी प्रस्ताव तयार केल्यानंतर तो, गुन्हे उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्फत अप्पर पोलिस आयुक्त अशोक मोराळे यांच्याकडे सादर करण्यात आला. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याण विधाते हे करीत आहेत.

अधिक वाचा : नदीपात्रात कार कोसळली; दांपत्य गंभीर जखमी