Fri, Sep 25, 2020 15:10होमपेज › Pune › महापालिकेला आर्थिक फटका

महापालिकेला आर्थिक फटका

Published On: Dec 09 2017 1:45AM | Last Updated: Dec 09 2017 12:51AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

महानगरपालिकेच्या बांधकाम परवाना उत्पन्नात यंदा मोठी घट झाली असतानाच आता समाविष्ट गावांमधील बांधकाम परवानगीचे उत्पन्न ‘पीएमआरडीए’ला मिळणार आहे. राज्य शासनाच्या आदेशामुळे महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

हद्दीलगतच्या 11 गावांचा महापालिकेत समावेश करण्याची अधिसूचना राज्य शासनाने 4 ऑक्टोबरला काढली. त्यामुळे आता ही गावे महापालिकेत आली असल्याने त्यामधील नवीन बांधकाम परवानग्या महापालिकेकडून दिल्या जाणार आहेत. मात्र अधिसूचना निघण्यापूर्वी 11 गावांमधील  पुणे महानगर क्षेत्रिय विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) दाखल झालेल्या बांधकामाच्या प्रस्तावांना नक्की कोण मंजुरी देणार, असा पेच निर्माण झाला होता.

त्यावर नगरविकास विभागाने ज्या प्रस्तावांचे छाननी शुल्क ‘पीएमआरडीए’ने भरून घेतले आहे, अशा प्रस्तावांना ‘पीएमआरडीए’मार्फत मंजुरी दिली जाईल असे स्पष्ट केले आहे. मात्र, ‘पीएमआरडीए’ने एका बांधकामाच्या प्रस्तावावर मागविलेल्या अभिप्रायावर शासनाने हा निर्णय दिला आहे. त्याची अंमलबजावणी इतरही प्रस्तावांना लागू केली आहे. त्यामुळे बांधकाम परवानगीचे सर्व शुल्क ‘पीएमआरडीए’ला मिळणार आहे. त्यामुळे आर्थिक नुकसानीबरोबरच पालिकेच्या डोकेदुखीतही वाढ होणार आहे.