व्यावसायिक अविनाश भोसले यांची ईडीकडून आठ तास चौकशी

Last Updated: Nov 27 2020 10:17PM
पुणे : पुढारी वृत्तसेवा

शहरातील प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची अमंलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) शुक्रवारी मुंबई कार्यालयात तब्बल आठ तासाहून अधिक चौकशी करण्यात आली. ईडीच्या तीन पथकांनी ही चौकशी केली. परकीय चलना विषयीच्या फेमा कायद्या अंतर्गत त्यांची चौकशी सुरू असल्याचे सुत्रांनी सांगितले.

दरम्यान, भोसले यांची एमएच 01 डीडी 0088 या क्रमांकाची कार सकाळ पासूनच मुंबईतील फोर्ट भागात उभी होती. या ठिकाणी अनेक वेळा पासून थांबलेली गाडी निदर्शनास येताच भोसले यांची चौकशी सुरू असल्याची चर्चा सुरू झाली. भोसले यांच्या चौकशीने चांगलीच खळबळ उडाली असून विविध प्रकारच्या चर्चाना उधान आले आहे.

भोसले यांचा बाणेर रस्त्यावर बंगला आहे. गणेशखिंड रस्त्यावर व्यावसायिक कार्यालय आहेत. राजकीय नेत्यांबरोबर घनिष्ट संबंध असलेल्या भोसले यांनी अनेक मोठे बांधकाम प्रकल्प साकारले आहेत. राजकीय नेत्यांबरोबर असलेल्या सलगीमुळे भोसले कायम चर्चेत राहिले आहेत.

मागील काही दिवसांपासून राज्यात राजकीय व्यक्तींच्या घरावर ईडीने छापसत्र सुरू केले आहे.  एकंदर राज्य व केंद्र सरकार यांच्यामधील संघर्ष ईडीच्या कारवाईने समोर आल्याचे दिसून येते. मुंबईतील शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने दोन दिवसांपूर्वी छापा टाकल्याची घटना ताजी असतानाच पुण्यातील  बांधकाम व्यावसायीक भोसले यांची चौकशी करण्यात आली.

सकाळी दहा वाजल्यापासून भोसले ईडीच्या कार्यालयात उपस्थित होते. रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास ते तेथून बाहेर पडल्याचे सुत्रांनी सांगितले. भोसले यांच्या कंपनीचे पुण्यात मुख्यालय आहे. त्या ठिकाणी देखील ईडीने छापा मारल्याची चर्चा सुरू होती. मात्र, या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.