Thu, Sep 24, 2020 15:43होमपेज › Pune › मेट्रो मार्गाच्या विस्ताराची मागणी 

मेट्रो मार्गाच्या विस्ताराची मागणी 

Published On: Dec 26 2017 1:33AM | Last Updated: Dec 26 2017 12:55AM

बुकमार्क करा

पुणे : ज्योती भालेराव-बनकर 

पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनची नेमणूक करून त्यांच्याकडून सुमारे 31.254 किलोमीटर लांबीसाठी ‘पुणे मेट्रो रेल’ प्रकल्पाचा पुणे महानगर क्षेत्रासाठी स्वतंत्र प्रकल्प अहवाल तयार करून घेतला आहे. सध्या जनसामान्यांसह लोकप्रतिनिधींकडून मेट्रो मार्गांचा विस्तार करण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. 2021 पर्यंत पहिल्या दोन मार्गांची पूर्तता करून शहरात इतर ठिकाणी विस्तार करण्याबाबत राज्य शासनाबरोबर विचारविनिमय सुरू असल्याचे महामेट्रोचे संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले. 

भारतातील प्रमुख शहरांपैकी पुणे हे नवव्या क्रमांकाचे शहर आहे. औद्योगिक, शैक्षणिक क्षेत्रात वेगाने वाढणार्‍या शहरात सार्वजनिक वाहतुकीचा ताण वाढत आहे. त्यामुळे अपघातांत वाढ होते; शिवाय प्रदूषणात भर पडत आहे. यावर पर्याय म्हणून मेट्रोची संकल्पना अस्तित्वात येऊन महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरशन लि.ची स्थापना झाली आहे. पुणे महानगर क्षेत्रातील सुमारे 50 लाख लोकांना या सेवेचा फायदा होणार आहे. 

पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गिकेची लांबी 16.59 किलोमीटर आहे. त्यापैकी 11.57 किलोमीटर मार्ग उन्नत व 5.019 कि.मी. भूमिगत आहे. या मार्गावर 9 उन्नत तर 6 भूमिगत स्टेशन्स आहेत. वनाज ते रामवाडी या मार्गिकेची लांबी 14.665 कि.मी. असून ही संपूर्ण मार्गिका उन्नत असून, 16 स्टेशन्स आहेत. हे सर्व मार्ग दाट वस्तीतून जातात, याचा फायदा नागरिकांना होणार आहे. परंतु, झपाट्याने होणारा शहराचा विस्तार बघता हे 31 किलोमीटरचे मेट्रोचे जाळे निश्‍चितच पुरेसे नाही याची जाणीव लोकप्रतिनिधींना आहे. 

संपूर्ण शहरासह उपनगरांनाही मेट्रोची सुविधा पोहोचवायची असल्यास महामेट्रो आणि पुणे महानगर शहर विकास प्राधिकरण (पीएमआरडी) यांना मेट्रो विस्ताराचे नियोजन करणे आवश्यक आहे. मेट्रोच्या पहिल्या दोन मार्गांचे काम सुरू असतानाच या विस्तारीकरणाचाही विचार व नियोजन केले जाणार असल्याचे ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले. 

या ठिकाणी होतेय मेट्रोची मागणी 

मेट्रोचा पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट हा मार्ग पुढे कात्रजपर्यंत न्यावा; तसेच पिंपरी ते निगडी या मार्गाच्या विस्ताराचीही  मोठी मागणी आहे.  वनाज ते रामवाडीवरून पुढे पुणे-नगर रस्त्याच्या वाघोलीपर्यंत मेट्रोसेवा हवी, असा लोकप्रतिनिधींसह नागरिकांचाही आग्रह आहे. याशिवाय वनाज ते चांदणी चौक अशा विस्ताराचाही विचार चालू आहे. टप्प्याटप्प्याने संपूर्ण शहरात दिल्लीप्रमाणे पुणे शहरातही 100 किलोमीटरचा मेट्रो मार्ग करण्यात येईल, असा विश्‍वास मेट्रो प्रशासनाने व्यक्त केला.

लोकप्रतिनिधींमध्ये वाद 

पुणे मेट्रो प्रकल्पांतर्गत दुसर्‍या टप्प्यात हडपसर मार्गावर मेट्रोचे नियोजन होते; मात्र आता भैरोबा नालावरून बंडगार्डनच्या दिशेने मेट्रोचे नियोजन करण्यात येत आहे. त्यावरून सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. हडपसर भागातील मेट्रो सत्ताधार्‍यांनी अन्य मार्गावर वळवून हडपसर भागावर अन्याय केला असल्याचा आरोप महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी केला आहे. हडपसरच्या मेट्रोबाबत सत्ताधारी पक्षाचे आमदार उदासीन असून, खासदारांना तर त्याबाबत माहिती नसल्याचे तुपे यांनी म्हटले आहे.