Sun, Aug 09, 2020 11:25होमपेज › Pune › दर्जाहीन हेल्मेट विक्रीच्या बाबतीत दैनिक पुढारीचा रियालिटी चेक

दर्जाहीन हेल्मेट विक्रीच्या बाबतीत दैनिक पुढारीचा रियालिटी चेक

Published On: Jan 12 2019 9:02PM | Last Updated: Jan 12 2019 9:17PM
पुणे : अशोक मोराळे

दुचाकी वाहनासाठी पुण्यात हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. याला पुणेकरांनी प्रचंड विरोध केला तर या सक्ती विरोधात मोर्चा देखील काढला होता. मात्र पोलिसांनी हेल्मेट सक्तीची कारवाई सुरूच ठेवली आहे. यामुळे हेल्मेट खरेदीसाठी दुकानात मोठी गर्दी होत आहे. तर कमी खर्चातील हेल्मेट देखील बाजारात मोठ्या प्रमाणात आहेत. याच हेल्मेटची वास्तविकता तपासण्यासाठी दैनिक पुढारीच्या प्रतिनिधीनीच्या वतीने वारजे वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित घुले यांच्यासह दोन पंचाच्या समोर रियालिटी चेक करण्यात आला.

हा प्रयोग करण्यासाठी रस्त्यावर तीनशे रुपयांचे एक हेल्मेट खरेदी केले तर दुसरे पंधराशे रुपयांचे चांगल्या दर्जाचे हेल्मेट घेतले. या हेल्मेटवर एका पंचाकडून ताकदीने घन मारण्यात आला. त्यावेळी हलक्या दर्जाच्या हेल्मेटचे दोन भाग झाले. हाच प्रयोग चांगल्या दर्जाच्या हेल्मेटवर केला असता असा कोणताही परिणाम झाला नाही. त्यामुळे एकंदर परीक्षणाच्या शेवटी असा निष्कर्ष निघाला की केवळ दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी खरेदी करण्यात येणारे हेल्मेट अपघात झाल्यानंतर डोक्याचे रक्षण करण्यासाठी उपयोगी ठरत नाही. यावेळी हा प्रयोग पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

हेल्मेट खरेदीची अशीही वास्तविकता

रस्त्यावरील विक्रेत्यांकडे १५० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंतची हेल्मेट विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तर दंडाची पावती ५०० रुपयांची आहे. त्यामुळे दुचाकीस्वार २०० रुपयांचे हेल्मेट खरेदी करत आहेत. अशाच एका व्यक्तीशी संवाद साधला असता, ते म्हणाले मी हेल्मेट 200 रुपयांना घेतले आहे आणि दंड पाचशे रुपये आहे शेवटी या हेल्मेटमुळे माझे 300 रुपये वाचले. एकंदर या प्रसंगावरून नागरिकांनी देखील साधी व सोपी पद्धत शोधून काढल्याचे दिसून येते आहे.

दोन्ही हेल्मेट माझ्यासमोर विकत आणले. मी माझ्या हाताने दोन्ही हेल्मेटवर हातोडी मारली. याच्यामध्ये रस्त्यावरील हेल्मेट जीव धोक्यात घालणारे आहे. मला देखील वाटायचे हेल्मेटसक्ती कशासाठी हवी, मात्र हा प्रकार पाहून मी हेल्मेटसक्तीचे समर्थन करतो. कारण आपला जीव सर्वात महत्त्वाचा आहे. नागरिकांनी पैशाचा विचार न करता चांगल्या दर्जाच्या हेल्मेट खरेदी करावे रस्त्यावरील हेल्मेट खरेदी करु नये.

संतोष नानवरे, अध्यक्ष मराठा युवक संघ

सध्या शहरामध्ये वाहतूक विभागाकडून हेल्मेटच्या अनुषंगाने कारवाई करण्यात येत आहे. हेल्मेटसक्ती करण्यामागे नागरिकांकडून दंड वसूल करणे हा मुळीच उद्देश नाही. दंडापेक्षा पुणेकरांची सुरक्षितता महत्वाची आहे. त्यामुळे सर्वांनी केवळ दंडात्मक कारवाई होत आहे म्हणून दर्जाहीन हेल्मेट खरेदी करु नये. आपला जीव सर्वात महत्त्वाचा आहे त्यासाठी चांगल्या हेल्मेटचा वापर करावा. सर्व नागरिकांच्या समोर आपण दोन्ही प्रकारच्या हेल्मेटची गुणवत्ता तपासली असून त्याची वास्तविकता तुमच्या समोर आहे. सर्व नागरिकांना वाहतूक शाखेच्या वतीने आवाहन आहे हेल्मटचा वापर करताना चांगल्या दर्जाचे हेल्मेट. वापरा.

- अमित घुले, सहाय्यक पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग वारजे