पुण्यात विकसित होतेय कोरोना प्रतिबंधक लस

Last Updated: Feb 19 2020 2:01AM
Responsive image


पुणे : कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी लस विकसित करण्याच्या दृष्टीने पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने अमेरिकेतील बायोटेक्नॉलॉजी कंपनी कोडाजेनिक्सच्या साहाय्याने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.  त्यांनी ही लस प्राथमिक स्थितीत तयार केली आहे. त्याची वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर पुढील सहा महिने  प्राण्यांवर चाचणी केली जाईल. त्यामध्ये यश मिळाल्यास पुढील वर्षाभरात या लसीची चाचणी मनुष्यावर केली जाईल. या चाचण्या यशस्वी झाल्यास 2022 मध्ये ही लस उपयोगात आणता येईल.

चीनसह अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत. जगभर कोरोना विषाणूने बाधित झाल्याच्या संशयावरून लोकांची वैद्यकीय तपासणी सुरू आहे. त्यामुळे त्यावरील लस शोधण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अशा स्थितीत पुण्यातील सीरम संस्थेने लस शोधून काढली आहे. मानवी चाचणी सुरक्षिततेच्या दृष्टीने यशस्वी झाल्यानंतर या लसीला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मंजुरी घ्यावी लागणार आहे. त्यानंतरच तिचा वापर करता येईल. या लसीचा वापर 2022 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. 

कोणतीही लस तयार करण्यासाठ तीन ते चार वर्षाचा कालावधी लागतो. परंतु आम्ही अमेरिकेतील बायोटेक्नॉलॉजी कंपनी कोडाजेनिक्सच्या मदतीने कोरोनावर लस तयार करत आहोत. कोरोनाचा कृत्रीम व्हायरस तयार करण्यात आला असून, त्यावर प्रयोग केला जात आहे.  आठवडाभरात उंदीर आणि माकडावर लसीचा प्रयोग केला जाणार आहे. त्याचा दोन महिन्यांत परिणाम दिसून येईल. त्यानंतर भारतात किंवा इतर देशात आरोग्य विभागाच्या परवानगीने मनुष्यावर प्रयोग केला जाईल. पुढील दोन वर्षात ही लस बाजारात उपलब्ध होऊ शकते. कोरोना व्हायरसवर लस तयार करणे हे आमचे स्वप्न असून, त्यासाठी प्रयत्न करत आहोत. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने भविष्यात तत्काळ लस उपलब्ध करुन देऊ शकतो.
- आदर पुनावाला, 
मुख्य कार्यकारी अधिकारी, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया,