होमपेज › Pune › पुण्यात कोरोना गर्दीत चेंगरुन मेला की काय ? : अजित पवार

पुण्यात कोरोना गर्दीत चेंगरुन मेला की काय ? : अजित पवार

Last Updated: Nov 22 2020 6:51PM
पुणे : पुढारी वृत्तसेवा 

प्रामुख्याने कोरोनाचा फटका सर्वच क्षेत्राला बसला असून पूर्वीसारखी परिस्थिती होण्याच्या दृष्टीने सरकार काम करीत आहेत. परंतु, दिवाळीच्या निमित्ताने पुण्यातील रस्त्याच्यावर खूप गर्दी पहायला मिळाली. या गर्दीत कोरोना चेंगरुन मेला की काय असे मला वाटले, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे व्यक्त केले.

पुण्यात आज (दि. २२) राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अरुण लाड आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.  यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राज्याचे मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार अमोल कोल्हे, जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर आणि पक्षाचे आमदार उपस्थित होते. 

यावेळी अजित पवार म्हणाले, ‘दिवाळीत पुण्याच्या रस्त्यांवर इतकी गर्दी होती की, कोरोना चेंगरून मेला की काय ? अशी परिस्थिती होती. पुण्यातील बाजीराव रस्त्यावर तर भयानक गर्दी होती’.

..पुन्हा कोरोना होत नाही डोक्यातून काढा

लस आली म्हणता पण कधी येणार ही लस ? माणस मेल्यावर लस येणार का ? असे सांगताना अजित पवार म्हणाले, कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. याचा प्रत्यय दिल्लीत आला आहे. तेथील आरोग्य व्यवस्था अपुरी पडत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे एकदा कोरोना झाल्यानंतर पुन्हा होत नाही हे डोक्यातून काढा. सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

महाविकास आघाडीचा धर्म पाळा

शिक्षक आणि पदवीधरांचे प्रश्न त्या त्या राज्यापुरते मर्यादित असतात. त्यांच्या प्रश्नावर राज्य सरकारने तोडगा काढायचा असतो. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यभरात पाच उमेदवार उभे केले आहेत. त्यांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. प्रत्यक्ष मतदारांपर्यत आपण पोहोचलो पाहिजे. काँग्रेस आणि शिवसेनेला विश्वासात घेऊन आपण पुढे गेलो पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसची सगळ्या सेलच्या प्रमुखांना विनंती आहे की, कोरोनाच्या काळात आपल्याला पूर्ण क्षमतेने काम करता आले नाही. ही उणीव आता आपल्याला भरून काढायची आहे. काही कार्यकर्ते नको ते बोलत असतात, वाचाळ बडबड करीत असतात, त्याने पक्षाचे नुकसान होते.

कोरोना नको रे बाबा

कोरोनाचा अनुभव मी पण घेतला आहे, फार भयानक काम आहे. कोणी भेटायला येत नाही, काही नाही. कुठल्याही राजकीय व्यक्तीला कार्यकर्ते भेटल्याशिवाय करमत नाही. पण कोरोना झाल्यानंतर यातलं काही होत नाही. असा स्वानुभव उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कथन केला.