Mon, Aug 10, 2020 04:37होमपेज › Pune › मध्य रेल्वेच्या संकेतस्थळालाही मराठीचे वावडे

मध्य रेल्वेच्या संकेतस्थळालाही मराठीचे वावडे

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : निमिष गोखले 

मध्य रेल्वेच्या संकेतस्थळालादेखील मराठीचे वावडे असल्याचे धक्कादायक आणि चीड आणणारे चित्र सध्या दिसत आहे. मध्य रेल्वेची इत्थंभूत माहिती सांगणारे, ‘सीआर डॉट इंडियन रेल्वेज डॉट जीओव्ही डॉट इन’ हे संकेतस्थळ असून, त्यावर केवळ हिंदी व इंग्रजीचाच पर्याय दिल्याचे दिसून येते. विशेष बाब म्हणजे मध्य रेल्वेचे मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर, भुसावळ हे पाचही विभाग महाराष्ट्रात येत असूनही मराठी भाषेला संकेतस्थळावर मात्र स्थान देण्यात आलेले नाही. 

संकेतस्थळावर क्‍लिक केल्यावर ते इंग्रजीतच उघडते. हिंदी भाषेचा पर्याय तेथे देण्यात आला आहे; परंतु मराठीचा पर्यायच देण्यात न आल्याने सर्वसामान्य मराठी जनतेची प्रचंड गैरसोय होत असून, मराठी भाषेचा पर्याय संकेतस्थळावर तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. राज्याची लोकसंख्या सुमारे 11 कोटी 60 लाख असून यापैकी बहुसंख्य नागरिक मराठी भाषिक आहेत. तरीदेखील मातृभाषेबाबत रेल्वेकडून वारंवार करण्यात येणारा दुजाभाव सुरूच असून प्रादेशिक अस्मिता व मराठीचा अभिमान बाळगणार्‍या राजकीय पक्षांकडून एक चकार शब्दही काढला जात नाही, असे वास्तव दिसते. 

दरम्यान, राज्यातील केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये हिंदी, इंग्रजीसह मराठी भाषा बंधनकारक करण्यात आली असून, 7 डिसेंबर 2017 रोजी रेल्वे, बँक, टपाल, विमानतळ, मेट्रो, आदी सरकारी कार्यालये, स्थानके व संकेतस्थळांवर मराठीचा वापर सक्तीचा केला जावा, असा आदेश राज्य सरकारने दिला होता. या आदेशाला रेल्वेने पायदळी तुडवल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. मध्य रेल्वेचे संकेतस्थळ उघडल्यानंतर संपर्क, प्रवाशांसाठी सूचना, अन्य माहिती, बातम्या, निविदा, प्रेस नोट, आदी रकाने असून, मराठीचा त्यात नामोल्लेखही नाही. सर्व माहिती हिंदी व इंग्रजी भाषेत असून, मराठीला रेल्वेकडून सातत्याने देण्यात येणारी सापत्न वागणूक पुन्हा एकदा समोर येत आहे.

याबाबत मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांच्याशी संपर्क साधला असता ‘संबंधित विभागाला सूचित करण्यात येईल’, असे बेजबाबदार उत्तर देण्यात आले. तर पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. ‘हिंदी राष्ट्रभाषा असली व इंग्रजी जागतिक भाषा असली तरीदेखील राज्यातील सामान्य माणसाला मराठीच समजते. दक्षिणेकडील राज्यात त्यांच्या-त्यांच्या प्रादेशिक भाषेत व्यवहार चालतो. मग राज्यातच मराठी भाषेला का डावलण्यात येते? असे मत रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी व्यक्त केले आहे. 

अमराठी अधिकार्‍यांनी मराठी शिकावे

मध्य रेल्वेचे बहुसंख्य अधिकारी हिंदी भाषिक असून, त्यांना मराठीचा गंधच नाही. पत्रकारांना पाठविण्यात येणार्‍या प्रेस नोट देखील हिंदी, इंग्रजीतच असतात. रेल्वे अधिकार्‍यांनी दिवसा रेल्वेचे कामकाज व रात्री रात्र प्रशालेत नाव नोंदवून मराठी भाषा शिकून घ्यावी व पत्रव्यवहारासकट अन्य सर्व व्यवहार मराठीतच करावेत, असे मत रेल्वे तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्राच्या भूमीत रेल्वेचे सर्व व्यवहार मराठीतच व्हायला पाहिजेत, यासाठी शासनाने कंबर कसून अंमलबजावणी करावी, असेही तज्ज्ञांनी सांगितले. 

रेल्वेत मराठी माणसांची फौज, पण... 

रेल्वेला आतापर्यंत मधू दंडवते, सुरेश कलमाडी, राम नाईक, सुरेश प्रभू यांसारखे मराठी रेल्वे मंत्री लाभले. मात्र, दुर्दैवाने यापैकी एकाने देखील राज्यात मराठी भाषेतून रेल्वेचा व्यवहार चालावा, यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून येत नाहीत. पुणे विभागात देखील मराठी माणसांची फौज असून, त्यांच्याकडे रेल्वेची प्रमुख पदे आहेत. विभागीय रेल्वे व्यवस्थापकपदी मिलिंद देऊस्कर , विभागीय सुरक्षा आयुक्तपदी डी. विकास, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधकपदी कृष्णाथ पाटील, जीआरपी पोलिस अधिक्षकपदी डॉ. प्रभाकर बुद्धीवंत आहेत. रेल्वेच्या पुणे विभागाची धुरा या मराठी भाषिकांच्या हाती असून देखील मराठी भाषेला योग्य न्याय मिळालेला नाही, असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल.  


  •