Sun, Sep 20, 2020 06:46होमपेज › Pune › शिक्षक आमदार कपिल पाटील यांची मागणी

स्पर्धा परीक्षांतील समांतर आरक्षण रद्द करा 

Published On: Dec 26 2017 1:33AM | Last Updated: Dec 26 2017 12:52AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणार्‍या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये समांतर आरक्षण लागू करण्यात आले आहे. यामाध्यमातून स्पर्धा परीक्षा देणार्‍या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना डावलण्यात येत आहे. सरकारने आयोगाकडे हस्तक्षेप करुन मागासवर्गीय उमेदवारांवर अन्याय करणारे समांतर आरक्षण धोरण रद्द करायला हवे, अशी मागणी शिक्षक आ. कपील पाटील यांनी केली आहे. 

आयोगाद्वारे शासनाच्या 2014 च्या परीपत्रकाचा आधार घेत समांतर आरक्षण सुरू केल्याने प्रामुख्याने महिला व खेळाडू परीक्षार्थी उमेदवारांवर अन्याय होत आहे. त्याविरोधात समांतर आरक्षण रद्द करण्यात यावे, यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. रविवारी आंदोलक विद्यार्थ्यांची राष्ट्र सेवा दल येथे आ. पाटील यांनी संवाद साधला. त्यावेळी सुमारे पन्नास विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी अ‍ॅड. सयाजी शिंदे, राकेश नेवासकर, निलेश कापकर, मनिषा सानप, संदीप आखाडे हे उपस्थित होते. 

यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आ. पाटील म्हणाले की, मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर होणार्‍या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सभागृहात प्रश्‍न उपस्थित करण्यात आला होता. 

हिवाळी अधिवशनात औचित्याचा प्रश्‍न उपस्थित करत विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे. याविषयी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना भेटून प्रश्‍न मार्गी लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभा असल्याचे सांगत, विद्यार्थ्यांनी एकत्र येत लढा उभा करण्याचे आवाहन केले. वेळप्रसंगी कायदेशिर लढाई देत, शासनाला जीआरमध्ये बदल करण्यास भाग पाडू, असे पाटील यावेळी म्हणाले. 

यावेळी आ. कपील पाटील यांनी स्पर्धा परीक्षा करणार्‍या विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच त्यावर काय उपाययोजना करता येतील याबाबत चर्चा केली. या कार्यक्रमाचे आयोजन कुलदीप आंबेकर, निलेश निंबाळकर यांनी केले.