Mon, Sep 21, 2020 12:09होमपेज › Pune › बारामती : बेकायदा सावकारी; तिघांविरोधात गुन्हा   

बारामती : बेकायदा सावकारी; तिघांविरोधात गुन्हा   

Last Updated: Jul 03 2020 1:22PM
बारामती : पुढारी वृत्तसेवा

व्याजाने दिलेल्या चार लाखांच्या बदल्यात 5 लाख 60 हजार रुपये वसूल केल्यानंतरही, पैसे घेण्याऱ्याची कुलमुखत्यार पत्र करून घेतलेली 19 आर जमिन परस्पर विक्री केल्याप्रकरणी, प्रताप रमेश जाधव (रा. शिवनगर, बारामती) याच्यासह अन्य तिघांविरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील डॉ. बी. बी. निंबाळकरांना मागितलेली 50 लाखांच्या खंडणीसह यापूर्वी सावकारीचे दोन गुन्हे जाधव याच्यावर दाखल आहेत. त्यामुळे गेली तीन महिन्यांपासून तो कारागृहात आहे. 

याबाबत संतोष भाऊसो भोसले (वय 42, रा. फलटण रोड, द्वारका निवास, बारामती) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार प्रताप जाधव याच्यासह त्याचे आमराईतील तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, सन 2012 साली जळोची येथील काळूराम जमदाडे यांची कटफळ येथील अडीच एकर जमिन विक्रीला निघाली होती. ही जमिन घेण्याची फिर्यादीची इच्छा होती. परंतु त्यांच्याकडे दोन लाख रुपये होते. त्यामुळे उरलेल्या रकमेची तजवीज करताना त्यांना प्रताप जाधव हा व्याजाने पैसे देत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे 2012 साली फिर्यादी व त्यांचा मित्र संदीप शरद भोई या दोघांनी प्रताप जाधव याची भेट घेतली. मी पैसे देतो परंतु त्यापोटी दरमहा मला 10 टक्के व्याज द्यावे लागेल, पैशाच्या संरक्षणासाठी कोणत्याही स्थावर मालमत्तेचे कुलमुखत्यार करून द्यावे लागेल, असे जाधव याने सांगितले. त्यानुसार फिर्यादीने त्यांचे सावळ येथील जमिन गट क्रमांक 254 मधील 19 आर जमिनीचे कुलमुखत्यार दुय्यम निबंधक कार्यालयात करून दिले. त्यानंतर जाधव याने 4 लाख रुपये महिना दहा टक्के व्याजाने दिले. पैसे दिल्‍यानंतर जाधव याने कटफळ येथील जमिनीचा व्यवहार केला.

या व्याजाने घेतलेल्या रकमेपोटी फिर्यादीने 5 लाख 60 हजार रुपये परत केल्यानंतर फिर्यादी व त्यांचे मित्र भोई हे जाधव याच्याकडे गेले. आमचे कुलमुख्त्यार रद्द करून दे, अशी विनवणी त्यांनी केली. परंतु त्यानंतर प्रताप जाधव व आमराई परिसरातील तिघांनी त्यांच्या घरी येत मुले व पत्नीसमोर धमकी दिली. तुझ्यावर खोटा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करेन, जमिनीचा नाद सोड असे त्यांनी सांगितले. त्यामुळे घाबरलेल्या फिर्यादीने तो विषय पुन्हा काढला नाही. दरम्यानच्या कालावधीत हे 19 आर क्षेत्र जाधव याने परस्पर विकल्याची माहिती फिर्यादीला मिळाली. त्यानंतर या प्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली.

खासगी सावकारीवर पुढारीचा हातोडा

बारामती शहर व तालुक्यातील खासगी सावकारीविरोधात दै. पुढारीने गेली दोन वर्षे सातत्याने निर्भिड लेखण केले आहे. भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीतही दि. 15 मार्च रोजी दैनिक पुढारीमध्ये जाधव याच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आल्याची बातमी वाचली. त्यानंतर भिती नाहीशी झाल्याने फिर्याद देत असल्याचे म्हटले आहे. 

येथील डॉ. बी. बी. निंबाळकर यांना 50 लाखांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणापासून प्रताप जाधव कारागृहात आहे. त्यानंतर  त्याच्याविरोधात येथील एका फूटवेअर व्यावसायिकानेही सावकारीची फिर्याद दिली. त्यानंतर सावकारीचा आणखी एक गुन्हा त्याच्यावर दाखल झाला होता. आता भोसले यांच्या फिर्यादीनुसार त्याच्यावर चौथा गुन्हा दाखल झाला आहे. 

 "