Mon, Sep 21, 2020 12:40होमपेज › Pune › पुणे : राजगुरूनगरातील मंदिरे न उघडल्याने भाजप कार्यकर्त्यांचा निषेध (video)

पुणे : राजगुरूनगरातील मंदिरे न उघडल्याने भाजप कार्यकर्त्यांचा निषेध (video)

Last Updated: Aug 05 2020 3:36PM

राजगुरूनगरातील मंदिरे उघडण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांचा निषेधराजगुरूनगर (पुणे) :  पुढारी वृत्तसेवा 

अयोध्येतील राम मंदिर पायाभरणी कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर राजगुरूनगर शहरातील मंदिरात घंटा नाद व पूजा विधी करण्यासाठी परवानगी नाकारल्याच्या निषेधार्थ तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि.५) प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. राजगुरूनगर येथील हनुमान मंदिर परिसरात भाजपचे खेड तालुका अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, राजगुरुनगर नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजी मांदळे, शहराध्यक्ष बाळासाहेब कहाणे, निलेश घुमटकर, प्रशांत कर्नावट, प्रल्हाद कुंभार, सुदर्शन मुळूक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका कार्यवाहक रमेश कोबल, सुभाष भालेकर आदींनी उपस्थित राहून हा निषेध नोंदवला. 

वाचा : शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचे निधन

राम मंदिर उभारणीचा सोहळा अयोध्येत बुधवारी संपन्न झाला. या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यात सुद्धा अत्यंत उत्साही वातावरण होते. कोरोनामुळे सोशल डिस्टन्स पाळत आपल्या घरी किंवा गाव परिसरात राहून बहुतांश नागरिक या कार्यक्रमाचा भाग बनले. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घंटा नाद, विधिवत पूजा- अर्चा असे धार्मिक विधी करण्याचे नियोजन केले. मंदिर परिसरात लाडू वाटप, दिपोत्सव करण्यात येणार होता. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजगुरुनगर शहरातील सर्व मंदिरे बंद होती. या वेळेपूरती ती नागरिकांना खुली करून द्यावीत असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता. मात्र त्याला प्रशासनाने मान्यता दिली नाही. यामुळे कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम किंवा पुजा-अर्चा कार्यकर्त्यांना करता आली नाही. लोकांच्या धार्मिक भावना दडपण्याचा हा प्रकार आहे. शासनाच्या या कृतीमुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून याचा खेड तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी राजगुरुनगर शहरातील मारुती मंदिराजवळ येऊन निषेध व्यक्त केला. 

वाचा : नवलकिशोर राम दिल्लीत जाणार; पुण्याचा जिल्हाधिकारी कोण?

तालुक्यातील सर्वधर्मीय नागरिक समभावाने एकमेकांचे सण एकत्रित सहभाग घेऊन आनंदाने साजरे करतात. मात्र प्रभू रामचंद्र यांच्या ऐतिहासिक उत्सवावेळी शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे नागरिक दुखावले आहेत. अशा तीव्र भावना भाजपचे तालुका अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, माजी नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यांनी व्यक्त केल्या. तसेच शासन निर्णयाचा जाहीर निषेध केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या नियमांचे पालन करण्यात आले असून याबाबत तहसीलदार सुचित्रा आमले व विभागीय पोलिस अधीक्षक गजानन टोम्पे यांनी अधिक प्रतिक्रिया द्यायला नकार दिला. 

कार्यकर्त्यांनी राममंदिर निर्माणाच्या शुभारंभानिमित्त राजगुरूनगर शहरात पाच हजार लाडू वाटप करण्याचे तसेच मंदिर परिसरात दिव्यांची रोषणाई करण्याचे नियोजन केले होते. मात्र कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो म्हणून पोलिसांकडून अडवण्यात आले. सोशल डिस्टन्स पाळून पूजा करायला आणि घंटानाद करायला अडवण्यात आल्याच्या घटनेचा आम्ही निषेध करतो.

-बाळासाहेब कहाणे अध्यक्ष, राजगुरूनगर शहर भाजप

 "