Sat, Aug 08, 2020 01:59होमपेज › Pune › निविदेतील ‘रिंग’मधून भाजपचा दरोडा  

निविदेतील ‘रिंग’मधून भाजपचा दरोडा  

Published On: Dec 21 2017 1:52AM | Last Updated: Dec 21 2017 1:40AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

शाहूनगर, चिंचवड येथील क्रीडांगणास सीमाभिंत बांधणे व इतर अनुषंगिक कामांच्या ई-निविदा प्रक्रियेत  पदाधिकारी, अधिकारी व ठेकेदारांची ‘रिंग’ झाल्याचे उघड होते. भाजप सत्ताधारी ‘पारदर्शक’ कारभाराच्या नावाने दरोडा टाकत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी बुधवारी (दि.20) केला. या संदर्भात आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे त्यांनी लेखी तक्रार केली आहे.  

‘विकासकामांत ‘रिंग’चा बाजार’ या शीर्षकाखाली ‘पुढारी’ने सोमवारी (दि.18) पान एकवर वृत्त प्रसिद्ध करून हे प्रकरण पुराव्यानिशी उघड केले होते. त्यावरून पालिका वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. हाच धागा पकडून बहल यांनी बुधवारी पालिका प्रशासन व भाजपला धारेवर धरले. 

बहल म्हणाले की, शाहूनगरमधील क्रीडांगणाच्या सीमाभिंतीच्या कामासाठी एकूण आठ निविदा प्राप्त झाल्या. पात्र असतानाही कोणतेही कारण न देता 5 ठेकेदारांना नाहक अपात्र ठरविण्यात आले.  ‘रिंग’मध्ये ठरलेल्या तीन ठेकेदारांमध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या ठेकेदारांच्या निविदा 1, 2 आणि 3 टक्के जादा दराने आल्या आहेत; तसेच पात्र ठरलेल्या तिघांपैकी दोन ठेकेदारांनी पालिकेचे एकही काम केलेले नाही. असे असतानाही अटी व शर्तीमध्ये बसवून त्यांना पात्र ठरविण्यात आले असल्याचा आरोपही बहल यांनी केला आहे. 

निविदा प्रक्रिया राबविणार्‍या अधिकार्‍यास भाजपच्या पदाधिकार्‍याने दमदाटी करून सदर प्रकरण केले असल्याचे बहल यांनी आरोप केला. या संदर्भातील पुरावे आयुक्तांना दिले आहेत. सदर निविदा रद्द करून फेरनिविदा काढण्याची मागणी त्यांनी केली; अन्यथा प्रशासन व पदाधिकार्‍यांच्या विरोधात न्यायालयात दाद मागण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या तर्‍हेने सर्वच ठेकेदारांना खूष करण्याचे धोरण आखले आहे. विरोधात असताना सत्ताधारी राष्ट्रवादीवर भ्रष्टाचार केल्याचे खोटेनाटे आरोप केले गेले. आजही राष्ट्रवादीवर आरोप केले जातात. राष्ट्रवादीवर आरोप करायचा आणि दरोडे टाकायचे काम सत्ताधारी भाजपने सुरू केले आहे. आता शहरवासीयांना कळत आहे की, खरे  भ्रष्टाचारी कोण आहे, असेही बहल म्हणाले. 

पालिकेचे 63 कोटींचे नुकसान
समाविष्ट गावांसह शहराच्या विविध भागातील रस्ते कामासाठी 425 कोटींच्या खर्चाला बुधवारी (दि.13) झालेल्या स्थायी समिती सभेत मंजुरी देण्यात आली. त्या कामात ‘रिंग’ झाल्याचा आरोप माजी नगरसेवक मारुती भापकर यांच्यापाठोपाठ विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी केला. ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळात कमी दराने निविदा भरल्या जात होत्या. भाजपच्या राजवटीत एकाच कामाचे भरमसाट विषय आणून रिंग केली जाते. रस्त्यासंदर्भातील 24 पेक्षा अधिक विषय एकाच वेळी आणले गेले. त्यापूर्वी सर्वच ठेकेदारांशी चर्चा करून दर निश्‍चित करून त्यांना कामे दिली गेली. त्यामुळे ठरवून केवळ दोन ते तीन टक्के कमी दराने निविदा भरल्या गेल्या. तथापि, अपेक्षित दर जास्त आहे. त्यामुळे या कामात पालिकेस तब्बल 63 कोटी रुपयांचा आर्थिक भुर्दंड पडून नुकसान झाले आहे, असा आरोप त्यांनी केला.