Sun, Aug 09, 2020 11:05होमपेज › Pune › वाळूचोरी रोखणार्‍या तहसीलदारांच्या बदलीकडे लक्ष

वाळूचोरी रोखणार्‍या तहसीलदारांच्या बदलीकडे लक्ष

Published On: May 08 2018 1:54AM | Last Updated: May 08 2018 1:41AMभिगवण : भरत मल्लाव

उजनीतील काळ्या सोन्यावर डल्‍ला मारणे, वाळू माफियांसाठी ‘बाये हात का खेल’ असाच आजवराचा फंडा होता. या वाळूवर डल्‍ला मारण्यासाठी महसूल विभाग, पोलिस, स्थानिक पातळीवरची साखळीही तेवढीच मजबूत असायची. त्यामुळे उजनी पाणलोट क्षेत्रातील इंदापूर तालुक्यात आजवरच्या इतिहसात करोडो रुपयांच्या काळ्या सोन्यावर डल्‍ला मारण्यात आला. परंतु गेल्या दीड वर्षात इंदापूरच्या खमक्या तहसीलदारांच्या दरार्‍यामुळे  काळ्या सोन्यावर अहोरात्र बेकायदेशीर डल्‍ला मारणार्‍या वाळू माफिया व त्यातील अभद्र युतीचे चांगलेच कंबरडे मोडले आहे. एका बाजूने वाळूची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे तर दुसर्‍या बाजूने कोट्यवधींची उलाढालही थंडावली आहे. त्यामुळे  काळ्या सोन्याची राखण करणार्‍या इंदापूर तहसीलदार यांची कधी एकदाची बदली होती, असे वेध वाळू माफियामध्ये लागून राहिले आहेत. 

उजनी पाणलोट क्षेत्रात इंदापूर, दौंड, कर्जत व करमाळा या चार तालुक्यांत काळ्या सोन्याचा मोठा खजिना असल्याने याची कोट्यवधी रुपयांची सर्रासपणे  आणि दिवसाढवळ्या लूट वाळू माफियांकडून होत आली आहे. वाळूतून मिळणार्‍या बक्‍कळ पैशांमुळे या चारही तालुक्यांत गुन्हेगारी क्षेत्राचे पाळेमुळे अगदीच खोलवर रूतली आहेत. यातून अनेकदा गँगवार भडकून कित्येकदा वाळू रक्ताळली आहे. बहुतांश बेरोजगार तरुणांनानी कमी कष्टात मुबलक पैसा हातात खेळत असल्याने तरुणांचा ओढा या वाळू व्यवसायाच्या साखळीत अडकला आहे. या भागातील बेकायदेशीर वाळू उपसा करण्यासाठी आतापर्यंत  महसूल विभाग व वाळू माफियांमध्ये उंदरा-मांजराचा खेळ चालत आला होता.

कोट्यवधी रुपयांची बेकायदेशीर वाळू उपसल्यावर कुठे चार-पाच लाख रुपयांचे नुकसान करायचे व कारवाई सुरू असल्याचा देखावा करण्यात येत होता.त्यानंतर लगेचच ‘ये रे माझ्या मागल्या’ या उक्तीप्रमाणे वाळू उपसा सुरू होत होता. विशेष म्हणजे महसूल विभागाच्या वरिष्ठांनी किती डोळ्यात तेल घालून वाळू उपसा बंद करण्याचा निर्णय घेतला तो कधीही यशस्वी ठरला नाही. कारण या बेकायदा वाळू उपश्यात वाळू माफिया, पोलिस, व महसूल विभागाची अभद्र युती कायद्यापेक्षा सरस ठरत आली होती. मात्र गेल्या दीड वर्षात उजनी पाणलोट क्षेत्रातील इंदापूर भागातील चित्रच पालटून गेले आहे. कितीही चोरट्या पद्धातीने वाळू चोरायची म्हणजे माफियांना धडकी भरल्याशिवाय राहत नाही. अनेक वाळू माफियांनी बेकायदेशीर वाळू उपश्यासाठी वरपासून खालपर्यंत वशिले लावले,  तर कोणी दहशतीचा वापर केला; मात्र, प्रशासनात एकादा खमक्या अधिकारी काय असतो हे इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांने दखवून दिले आहे.