Tue, Jun 15, 2021 11:37
पुणे पोलिसांच्या तपास पथकावर उत्तर प्रदेशात हल्ला

Last Updated: May 11 2021 6:59PM

पुणे : पुढारी वृत्तसेवा

बुधवार पेठेतील पोलिस हवालदाराच्या खून प्रकरणातील संशयित महिला आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पुणे पोलिसांच्या तपास पथकावर उत्तर प्रदेशातील गाझियाबाद थाना नंद ग्राम क्षेत्र येथील परिसरात स्थानिक जमावे हल्ला केला. दगडफेक करत चारचाकी इनोव्हा गाडीची तोडफोड करण्यात आली असून, तेथील स्थानिक पोलिसांसह पुणे पोलिसांच्या पथकातील काही कर्मचाऱ्यांना किरकोळ मारहाण झाल्याचे समजते. मात्र, अशा परिस्थितीत देखील हिंम्मत न हारता प्रसंगावधान राखत पोलिसांनी संशयित महिलेला ताब्यात घेतले आहे.

सोमवारी दुपारी (दि. ११) ही घटना घडली आहे. याप्रकरणी गाझीयाबाद पोलिसांनी सहा संशियतांना ताब्यात घेतले असून, त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती गाझीयाबाद पोलिसांनी ट्विटरद्वारे दिली आहे. या तोडफोडीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात तेथील तरुण पुणे पासिंग असलेल्या गाडीची तोडफोड करीत असल्याचे दिसत आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या आठवड्यात ५ मे रोजी बुधवार पेठेत मध्यरात्री तडीपार गुंड प्रवीण महाजन याने पोलीस हवालदार समीर सय्यद याचा चाकूने गळा चिरून खून केला होता. या प्रकरणातील संशयित महिला प्रवीण महाजनबरोबर होती. तिचा पोलीस शोध घेत होते. ही महिला गाझियाबादला पळून गेल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार फरासखाना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील व ४ पोलीस सहकारी हे खासगी गाडीने गाझियाबाद येथे गेले होते.तेथील स्थानिक पोलिसांची मदत घेत संशयित महिला थांबलेल्या ठिकाणी पुणे पोलिसांनी धडक दिली. पोलीस पथक तेथे गेल्यावर स्थानिकांनी त्यांना विरोध करत मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर दगडफेक केली. त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

फरासखाना पोलिस ठाण्याचे पथक गाझियाबादला गेले आहे. त्यांच्या गाडीवर स्थानिकांनी दगडफेक केली आहे. मात्र, कोणीही अधिकारी अथवा कर्मचारी जखमी झालेले नाही. ज्या कामासाठी ते गेले होते. त्या महिलेला त्यांनी ताब्यात घेतले असून तिला घेऊन ते पुण्याकडे निघाले आहेत. उद्या पुण्यात पोहचतील.
राजेंद्र लांडगे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक फरासखाना पोलिस ठाणे 

सोमवारी (दि. १०) थाना नंद ग्राम क्षेत्र येथे संशयित आरोपीच्या शोधात आलेल्या महाराष्ट्र पोलिसांच्या पथकासोबत झालेल्या घटने बाबात, गाझीयाबाद पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सहजणांना अटक देखील केली आहे. 
गाझीयाबाद पोलिस ट्विट