पुणे : किवळे पुलावर डांबराचा टँकर उलटला 

Last Updated: Jul 15 2020 12:46PM
Responsive image


देहूरोड (पुणे) : पुढारी वृत्तसेवा

द्रुतगती मार्गाने मुंबईहून सांगलीकडे निघालेला डांबर वाहतुकीचा टँकर उलटला आहे. दरम्यान चालकाचे नियंत्रण सुटल्याने किवळे पुलावर ही घटना घडली. सकाळी नऊच्या सुमारास हा अपघात झाल्याचे समजले. टँकरमधील १९ वर्षीय वाहक जखमी झाला आहे. उलटलेल्या टँकरमधील डांबर रस्त्यावर पसरल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.

टँकर चालक कलीमुद्दीन कमरूद्दीन खान (वय ३५, रा. मुंबई ) याने दिलेल्या माहितीनुसार. मंगळवारी रात्री मुंबईतील कॉटनग्रीन भागातून २८ टन डांबर भरलेला टँकर (क्रमांक एमएच०१ सीव्ही ९७४२) घेऊन तो सांगलीकडे निघाला होता. द्रुतगती मार्गावरील फूड प्लाझा जवळ पहाटे थोडी विश्रांती घेऊन सकाळी सहाच्या सुमारास तो पुढील प्रवासास निघाला. सकाळी नऊच्या सुमारास किवळे पुलावरील तीव्र वळणावर नियंत्रण सुटल्याने टँकर द्रुतगती मार्गावर उलटला. 

अपघातानंतर टँकर सुमारे दोनशे फुटांपर्यंत जमिनीवर घसरत पुढे गेला. पुलाचा कठडा आणि संरक्षणासाठी लावण्यात आलेल्या टायरमुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेत चालकाला किरकोळ दुखापत झाली असून वाहक राहुल यादव (वय १९, रा. मुंबई) हा किरकोळ जखमी झाला आहे. त्याला सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

अपघातग्रस्त टँकरमधून मोठ्या प्रमाणात डांबर रस्त्यावर पसरले होते. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस, देवदूत पथक, आयआरबी सुरक्षा पथक आणि डेल्टा फोर्सचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. रस्त्यावर वाहणारे डांबर पाट थोपविण्यासाठी कर्मचाऱ्यांनी मातीचा बांध घातला. तरीही काही प्रमाणात डांबर रस्त्यावर पसरल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.