Wed, Dec 02, 2020 08:44होमपेज › Pune › कलाकारांनी राजकारणात डोकावू नये 

कलाकारांनी राजकारणात डोकावू नये 

Published On: Feb 25 2018 1:16AM | Last Updated: Feb 25 2018 1:04AMपुणे : प्रतिनिधी

कलाकार, साहित्यिकांनी राजा काय करतोय, प्रजा काय करते हे विचारू नये. कलाकाराने आपली कला समृद्ध करून रसिकांना आनंद देण्याचे काम करावे, त्यांनी राजकारणात डोकावू नये, असा सल्ला भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा खा. पूनम महाजन यांनी दिला आहे. 

खा. महाजन यांच्या पश्‍चिम महाराष्ट्रीय ‘युवा संवाद यात्रे’चा समारोप शनिवारी येथील सारसबागेत झाला. यावेळी त्यांनी युवकांशी संवाध साधला. यावेळी एका युवा कवीने विचारलेल्या प्रश्‍नावर खा. महाजन यांनी हा सल्ला दिला. याप्रसंगी भाजयुचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मधुकेश्‍वर देसाई,  प्रवीण वटके, लीगल सेलच्या प्रमुख चारु प्रज्ञा, प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर, राज्य प्रभारी अतुल कुमार, सहप्रभारी अलोक डंगस, भाजयुचे शहराध्यक्ष नगरसेवक दीपक पोटे यांच्यासह भाजयुचे कार्यकर्ते उपस्थित होते. तत्पूर्वी खा. महाजन यांच्या संवाद यात्रेचे कात्रज चौकात शहराध्यक्ष नगरसेवक पोटे यांनी स्वागत केले. 

सारसबागेतील समारोप कार्यक्रमात जालण्याच्या युवा कवीने कलाकार साहित्यीकांसाठी शासनाच्या काय योजना आहेत, कलाकाराची कला घरापुरतीच राहणार का असा प्रश्‍न विचारला. यावर उत्तर देताना खा. महाजन म्हणाल्या, तु अगोदर मतदार यादीत नाव येण्यासाठी अर्ज कर. त्यानंतर त्या म्हणाल्या, साहित्यिक कलाकारांनी सर्वप्रथम मतदानाचा हक्क बजवणे गरजेचे आहे. कलाकाराचे वेगळे काम असते. त्यांनी आपली कला करावी,  सरकार काय करतोय, प्रजा काय करते, असे फालतू प्रश्‍न करू नयेत. 

दरम्यान, कार्यक्रमानंतर या विषयावर पत्रकारांशी बोलताना खा. महाजन यांनी सावरासावर केली. त्या म्हणाल्या, कला व साहित्य क्षेत्रात करण्यासारखे खूप आहे. नविन कलाकार खूप उंच काम करु शकतात. त्यांना सर्व विषयांवर बोलण्याचा अधिकार आहे. ते राजकिय भाष्यही करु शकतात.  

पवारांनी त्यांच्या पक्षात लक्ष द्यावे 

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोधक आणि केंद्रीय मंत्रीमंडळ, खासदारांशी संवाद नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केला आहे, यात तथ्य आहे का, असा प्रश्‍न विचारला असता, पंतप्रधानांचा संवाद आहे की, नाही हे आमच्या पक्षातील लोक सांगतील. पवारांनी सांगण्याची गरज नाही, त्यांनी त्यांच्या पक्षातील संवादाकडे लक्ष द्यावे, असे खा. महाजन म्हणाल्या. सध्या इंजिन घडाळाच्या ठोक्यावर चालायला लागले आहे, अशी टिप्पनीही त्यांनी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणे भाजपनेच महिलांना पक्ष पातळीवर 33 टक्के आरक्षण दिले आहे. सर्व राजकीय पक्षांनी अशाप्रकारचे महिलांना आरक्षण देणे गरजेचे आहे, असे मतही त्यांनी नोंदवले.