Sun, Sep 20, 2020 06:24होमपेज › Pune › पुणे : दरोड्याच्या तयारीतील सशस्त्र टोळी गजाआड

पुणे : दरोड्याच्या तयारीतील सशस्त्र टोळी गजाआड

Last Updated: Aug 12 2020 9:31PM

संग्रहित छायाचित्रपुणे : पुढारी वृत्तसेवा

हडपसर येथील प्रसिद्ध सराफी पेढीवर दरोडा टाकण्याच्या तयारीत आलेल्या सशस्त्र टोळीला गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने मंगळवारी (दि. ११) बेड्या ठोकल्या. यावेळी त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल व चार जिवंत काडतुसे, भारतीय बनावटीचे रिव्हॉल्व्हर व सहा काडतुसे, एक बारा बोर रायफल व दोन कोयते अशी हत्यारे तसेच एक फॉर्च्युनर कार आणि ॲक्‍टिवा स्कूटर असा एकूण १४ लाख ७४ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी एकूण सात जणांच्या मुसक्या आवळल्या असून, त्यातील पाच जण हे सराईत गुन्हेगार आहेत. विशाल उर्फ जंगल्या श्‍याम सातपुते (वय ३०), राजू शिरीष शिवशरण (वय २८), पंकज सदाशिव गायकवाड (वय ३४), आकाश राजेंद्र सकपाळ (वय २६), गणेश मारुती कुंजीर (वय २७), रामेश्वर बाळासाहेब काजळे (वय ३३) आणि ऋषिकेश राजेंद्र पवार (वय १९) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी आरोपींवर विविध कलमानुसार हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेच्या युनिट-३ मधील पोलिस नाईक अतुल साठे, हवालदार संतोष क्षीरसागर, सहायक पोलिस फौजदार किशोर शिंदे यांना खबऱ्यांकडून माहिती मिळाली की, पोलिस रेकॉर्डवरील आरोपी विशाल सातपुते हा साथीदारांसह मगरपट्टा हडपसर येथे एका फ्लॅटमध्ये थांबलेला आहे. तो हडपसर येथील प्रसिद्ध सराफाच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत आहे. 

त्यानुसार अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, उपनिरीक्षक किरण अडागळे, कर्मचारी शिंदे, मते, घाडगे,गरुड, एकबोटे यांनी पथकासह फ्लॅट नंबर 406, मगरपट्टा सिटी येथे छापा टाकून सातपुते याच्यासह त्याच्या इतर ६साथीदारांना अटक केली.

अशी आहे सराइतांची गुन्हेगारी कुंडली

आरोपी विशाल उर्फ जंगल्या हा खून प्रकरणातील आरोपी असून, सध्या तो १५ दिवसांच्या पॅरोल रजेवर कारागृहातून बाहेर आला आहे. त्याच्याविरुद्ध स्वारगेट, खडक पोलिस ठाण्यात खून, दरोडा, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत. सकपाळदेखील खून प्रकरणातील आरोपी असून, तो २०१४ मध्ये जामिनावर सुटला आहे. पंकज गायकवाड याच्याविरुद्ध कोंढवा, पौड, हडपसर पोलिस ठाण्यात खून, कट रचणे, दरोडा असे गुन्हे दाखल आहेत. तसेच शिवशरण याच्याविरुद्ध वानवडी व हडपसर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे.

 "