Mon, Aug 03, 2020 14:23होमपेज › Pune › सुगम-दुर्गम बदल्यांचे वेळापत्रक जाहीर

सुगम-दुर्गम बदल्यांचे वेळापत्रक जाहीर

Published On: Dec 21 2017 1:52AM | Last Updated: Dec 21 2017 12:39AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

शिक्षक संघटनांच्या रेट्यामुळे नोव्हेंबर महिन्यात जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या अखेर रद्द करण्यात आल्या होत्या. पंरतु बदल्या रद्द होतात न होतात तोच ग्रामविकास विभागाने शिक्षकांच्या बदल्या करण्याच्या हेतूने आतापासूनच कंबर कसली आहे. त्यासाठी बदल्यांसदर्भातील वेळापत्रकच जाहीर केले आहे. त्यामुळे मे 2018 पर्यंत बदली प्रक्रिया पूर्ण करण्याची घोषणा अगोदरच करण्यात आली असली तरी तत्पूर्वीच बदल्या करण्याकडे शासनाची वाटचाल सुरू झाली असल्याचे दिसून येत आहे.

जिल्हाअंतर्गत बदली संदर्भात न्यायालयीन प्रक्रियेमुळे झालेला विलंब, जिल्हास्तरावरून भरलेल्या माहितीमधील चुका दुरुस्त करण्यासाठी लागलेला वेळ यामुळे चालू शैक्षणिक वर्ष संपत आले तरी बदली प्रक्रिया पूर्ण होऊ न शकल्याने तसेच पुढील शैक्षणिक वर्षाच्या जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेला देखील या वर्षीप्रमाणे वेळ होऊ नये म्हणून अखेर नोव्हेंबर महिन्यात बदल्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

परंतु आता संवर्ग 1 ते 4 नुसार नव्याने अर्ज भरण्यात येणार आहेत. यासाठी सर्वसाधारण क्षेत्रात म्हणजेच सुगम भागात सलग दहा वर्ष तसेच अवघड क्षेत्रात म्हणजेच दुर्गम भागात सलग तीन वर्ष नोकरी करणार्‍या शिक्षकांची नव्याने यादी तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी माहिती गोळा करण्यासाठी व जेष्ठता यादी प्रसिद्ध करणे, आक्षेप मागविणे, त्यांची पूर्तता करणे आणि अंतिम यादी प्रसिद्ध करणे यासाठीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

वेळापत्रकानुसार 23 डिसेंबर रोजी तालुकास्तरावर याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. 24 ते 26 डिसेंबर दरम्यान तालुकास्तरावरील याद्यांवर आक्षेप जमा करून घेवून त्यांची पूर्तता, दुरूस्ती करणे आणि याद्या जिल्हास्तरावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.27 डिसेंबर रोजी जिल्हास्तरावर याद्या प्रसिद्ध केल्या जातील. 3 ते 9 जानेवारी 2018 दरम्यान तालुकानिहाय आक्षेप शिक्षणाधिकार्‍यांकडे जमा केले जातील.10 जानेवारी रोजी शिक्षणाधिकारी आक्षेपांवर अंतिम निर्णय घेतील. 13 जानेवारी रोजी शिक्षणाधिकारी स्तरावर या याद्या प्रसिद्ध केल्या जातील.14 जानेवारी ते 18 जानेवारी दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे शिक्षकांना अपील सादर करता येणार आहे. तर 20 जानेवारी रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी आक्षेपांबाबत निर्णय घेणार आहेत. 22 जानेवारी रोजी जिल्हास्तरावर अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. 23 ते 30 जानेवारी दरम्यान ऑनलाइन मॅपिंग करण्यात येणार आहे. चारही संवर्गाच्या याद्या वेगवेगळ्या तयार करण्यात येणार असून बदल्यांसदर्भातील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अधिकार्‍यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मे 2018 मध्ये बदल्या होणार, अशी घोषणा करण्यात आली असली तरी त्याअगोदर बदली प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन शासनाकडून करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.