बारामती : प्रतिनिधी
विधानसभेला इंदापूरची जागा तुम्हाला सोडू, असा विषय हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत कधीच झाला नव्हता. विधानसभेच्या जागेबाबत वरिष्ठ पातळीवर जो निर्णय होईल, तो मान्य करू, असे ठरले होते. परंतु इंदापूरला मेळावा घेत त्यांनी आमच्यावर टीका करत नाहक बदनाम केले. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला. परंतु ते उपलब्ध झाले नाहीत. भाजपमध्ये जायचे हे त्यांचे आधीच ठरले होते, आता उगाच ते आमच्या नावे पावती फाडत आहेत, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार यांनी केली.
आमदार पवार म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागावाटपाची बोलणी वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवर सुरु होती. इंदापूरला सध्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत. त्या जागेसंबंधी आम्ही हर्षवर्धन पाटील यांना कोणताही शब्द दिलेला नव्हता. हर्षवर्धन पाटील व माझा राजकीय वाद आहे, परंतु आम्ही शब्द पाळला नाही, हा त्यांचा आरोप चुकीचा असल्याचा पलटवार पवार यांनी केला. आम्हाला बदनाम करण्याचे काम कोणी करू नये, ते सहन केले जाणार नाही, असा इशाराही पवार यांनी दिला.
जिल्हा परिषदेतील राजकारणाविषयी बोलताना पवार म्हणाले, स्थायी समितीवर हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता यांची वर्णी लावावी, अशी स्पष्ट सूचना मी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांना केली होती. राष्ट्रवादीच्या सर्व सदस्यांनी त्यांना मतदान करावे, असेही मी सांगितले होते. मात्र या विषयातही नाहक संशय निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झाला. उलट ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिल्लीतील एका संस्थेवर अंकिताला सदस्यपदी संधी दिली.
लोकसभा निवडणुकीत मी त्यांची भेट घेत आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या पाठिशी उभे राहण्याचे आवाहन केले होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अन्य नेते त्यावेळी उपस्थित होते. पाटील यांनी विधानसभेला मला सहकार्य करा, असे आवाहन केले होते. त्यावेळी मी स्पष्टपणे विधानसभेच्या जागेचा निर्णय काँग्रेस व राष्ट्रवादीचे अध्यक्ष हे घेतील, तो जे निर्णय घेतील तो मी शिरसांवद्य मानेल, असे सांगितले होते. पाटील यांनी मेळावा घेतल्यानंतर मी त्यांना ५० ते ५५ फोन केले. पुण्यातील त्यांच्या घरी गेलो, परंतु ते तेथे भेटले नाहीत. त्यांनी आधीच त्यांचा निर्णय घेतला होता आणि आता आमच्या नावाने पावती फाडत आहेत, असे पवार म्हणाले.
विधानसभेचे जागा वाटप अद्याप झालेले नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रत्येकी १२५ जागांवर एकमत झाले आहे. घटक पक्षांना ३८ जागा सोडतो आहोत. विधानसभा मतदारसंघ निश्चित केली जात आहे. परंतु तत्पूर्वीच हर्षवर्धन पाटील यांनी मेळावा घेत आम्हाला बदनाम केल्याचा आरोप पवार यांनी केला.
विधानसभा-विधानपरिषद असा तोडगा शक्य होता
इंदापूरला राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे आमदार आहेत. त्यांच्यावर अन्याय नको. आणि शेजारधर्म म्हणून हर्षवर्धन पाटील यांनाही संधी मिळाली पाहिजे, या मताचा मी होतो. त्यामुळे एकाने विधानसभा लढवून आमदार व्हावे, दुसऱयाने काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाच्या सहकार्याने विधानपरिषदेवर जावे असा तोडगा काढता आला असता. आमदार म्हणून दोघांनाही काम करण्याची समान संधी, समान अधिकार मिळाले असते. परंतु पाटील यांनी जाणीवपूर्वक वातावरण तयार केले. आम्ही काही त्यांचा बांध रेटलेला नाही. त्यामुळे नाहक आमची बदनामी करू नका. अजित पवार जो शब्द देतो तो पाळता हे अख्या महाराष्ट्राला माहिती आहे, असे आ. पवार यावेळी म्हणाले.