पुणे : प्रतिनिधी
चार्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे, सरकारने दुष्काळ उशिरा जाहीर केला. डिसेंबर महिन्यात केंद्रीय पथक पाहणीसाठी जिल्ह्यात आले. ते पुन्हा दिल्लीला जाणार, मग अभ्यास, तोपर्यंत शेतकर्यांनी काय करायचे? असा सवाल करत सरकारला प्रशासनाकडून कामच करून घेता येत नसल्याची जोरदार टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या वतीने कृषिभूषण डॉ. अप्पासाहेब पवार पुरस्कार, कृषिनिष्ठ शरद आदर्श कृषिग्राम व आदर्श गोपालक पुरस्कारांचे वितरण पवार यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पवार म्हणाले, की कारखाने सुरू आहेत तोपर्यंत जनावरांच्या चाऱ्याचे व्यवस्थित चालेल, पण नंतर चार्यासाठी पशुपालकांचे हाल होतील. एसीत बसून कष्टकरी, शेतकर्यांना बसणार्या दुष्काळाची धग काय समजणार? दुष्काळी पाहणी पथक हे दौरा करत आहे. शेतकर्यांनी पथकाकडे गार्हाणी मांडल्यावर अधिकारी म्हणतात तुम्ही चारा पेरा, पण जिथे पाणीच नाही, ज्याठिकाणी कुसळेही उगवत नाहीत तिथे चारा पेरण्याचा सल्ला अधिकारी देत आहेत. निरव मोदी, विजय मल्ल्या सारख्या बड्या उद्योगपतींना सवलत दिली जाते मात्र शेतकर्यांची कर्जमाफी ही फक्त नावापुरतीच केली असल्याचीही टीका केली.
सदाभाऊ खोत यांनी केंद्राकडे कांद्यासाठी अनुदान मागणार असल्याच्या केलेल्या वक्तव्यावर पवार म्हणाले, माणूस अडचणीत आलाय तुम्ही केव्हा सांगणार? राज्यात दुष्काळाची भीषण पार्श्वभूमी असताना सरकार मात्र निर्णय घेत नाही़ चारा-पाणी नसल्याने शेतकरी जनावरे विकायला काढले आहेत. पण ती घायला सुद्धा कोणी पुढे येत नाही. सरकारने शेतकर्यांना याची नुकसान भरपाई दिली पाहिजे.
शेतकर्यांनी हात वर केलेच नाहीत...
राज्यातील शेतकर्यांना कर्जमाफी सरकारकडून दिल्याच्या मोठ्या जाहिराती केल्या, प्रत्यक्षात किती शेतकर्यांना कर्जमाफी मिळाली? येथे बसलेल्या शेतकर्यांपैकी कुणाला कर्जमाफी मिळाली त्यांनी हात वर करा असे पवारांनी म्हटल्यानंतर सभागृहात असलेल्या एकाही शेतकर्याने हात वर केला नाही. यावर पवारांनी याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे असे ते म्हणाले.
प्रोटोकॉल मोडणाऱ्यांवर कारवाईजिल्हा परिषदेच्यावतीने कृषीभूषण डॉ. अप्पासाहेब पवार पुरस्काराचे वितरण करण्यात आले. प्रोटोकॉलप्रमाणे पालकमंत्री या नात्याने मला जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमास बोलावणे, निमंत्रण पत्रीकेत नाव टाकणे बंधनकारण आहे. मात्र मला आज वेळ असतानाही निमंत्रण दिले नाही. तसेच पत्रिकेतही नाव टाकले नाही. त्यामुळे मी संबंधीत अधिकारी, पदाधिकारी यांच्यावर कारवाई करणार आहे. - गिरीश बापट, पालकमंत्री पुणे