Sat, Sep 19, 2020 08:54होमपेज › Pune › वरवरा राव यांना अत्यावश्यक सोयीयुक्त रुग्णालयात भरती करा

वरवरा राव यांना अत्यावश्यक सोयीयुक्त रुग्णालयात भरती करा

Last Updated: Jul 13 2020 1:45AM
पुणे : पुढारी वृत्तसेवा

कोरेगाव भीमा प्रकरणातील संशयित आरोपी कवी वरवरा राव हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असून, त्यांना अत्यावश्यक सोयी असलेल्या रुग्णालयात भरती करण्यात यावे, अशी मागणी राव यांच्या कुटुंबीयांनी केंद्र तसेच राज्य सरकारकडे केली आहे. राव यांच्या प्रकृतीसंदर्भात माहिती देण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने ऑनलाइन पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात होते. या वेळी राव यांच्या पत्नी पी. हेमलता, मुलगी पी. पवना, पी. अनाला, पी. सहजा उपस्थित होत्या. 

पी. हेमलता म्हणाल्या, वरवरा राव गेल्या दोन महिन्यांपासून आजारी असून, त्यांच्यावर कारागृहातील रुग्णालयातच उपचार करण्यात येत आहेत. कारागृहात करण्यात येणारा उपचार पुरेसा नसून, त्यांची प्रकृती गंभीर आहे. राव यांना साधं बोलतासुद्धा येत नाही. कारागृहात आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्यांना चांगल्या रुग्णालयात दाखल करण्यात यावे. यासाठी महाराष्ट्र सरकारने मदत करावी. कारागृह हे राज्य शासनाच्या अखत्यारीत  असल्याने त्यांनी विशेष लक्ष घालावे. आत्तापर्यंत राव यांचा जामीन अर्ज 5 वेळा फेटाळण्यात आला आहे. त्यांचे वय, तब्येत व कोरोनाच्या पार्श्वभूमीवरसुद्धा त्यांच्या जामीन अर्जावर दुर्लक्ष करण्यात आले आहे. सध्या जामीनाचा विचार न करता जे. जे. रुग्णालयासारख्या चांगल्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार व्हावेत. सरकराच्या निष्काळजीपणामुळे राव यांचा मृत्यू होऊ नये, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

 "