Mon, Jan 18, 2021 16:38होमपेज › Pune › मुंबई -पुण्यावरून येणाऱ्यांकडून इदापूरला वाढला धोका...

इंदापूर तालुक्यात आणखी २ कोरोना रुग्णांची भर 

Last Updated: May 22 2020 4:53PM

file photoइंदापूर : पुढारी वृत्तसेवा 

इंदापूर तालुक्यात आणखी दोन रूग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यात एका ४२ वर्षीय महिलेचा तर २२ वर्षाच्या युवकाचा समावेश आहे. हे दोन्हीही रूग्‍ण मुंबई वरून इंदापूर तालुक्यातील पोंदकूलवाडी या मुळ गावी परतले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. 

दि.२८ एप्रिल रोजी भिगवण परिसरातील एका महिलेला कोरोनाची लागण झाली होती. काही तासांतच तिचा मृत्युही झाला. त्यानंतर दि.१६ मे रोजी मुंबई येथून इंदापूर तालुक्यातील शिरसोडी येथे परतलेल्या दोन मायलेकींना कोरोनाची बाधा झाली असून, त्यांच्यावर इंदापूर जवळील डॉ. कदम गुरूकूल येथे उपचार सुरू आहेत.

असे असताना आता पोंदकुलवाडी येथे आणखी दोन रूग्ण आढळून आले. सध्या इंदापूर तालुक्यात मुंबई - पुणे अशा हॉटस्‍पॉट मधून जवळपास बारा हजारांहून अधिक नागरिक स्थलांतरित  झालेले  आहेत. शिरसोडी येथील दोन रूग्णांच्या नंतर केवळ सातचं दिवसात आणखी दोन रुग्णांची भर पडल्याने इंदापूरकरांची चिंता अधिकच वाढली आहे. हे दोन्हीही रूग्ण पोंदकूलवाडीत त्यांच्या घरीच क्वारंटाईन होते. मात्र त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आता त्यांच्यावर डॉ.कदम गुरूकूल येथे उपचार केले जाणार असल्याची माहिती इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी दिली. 

सध्या हे रूग्ण कोणाच्या संपर्कात आलेत का? किंवा यांच्या प्रवासाबाबत सखोल माहिती इंदापूर प्रशासनाकडून प्राप्त करण्याचे काम चालू आहे. शिवाय पोंदकुलवाडीचा तीन किलोमीटरचा परिसर सील करण्यात आला असून, त्या ठिकाणी कंटेन्मेंट झोन लागू झाला आहे. 

इंदापूर तालुक्यात मुबंई व पुणे व इतर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांची संख्या बारा हजारहून अधिक आहे. आता पर्यंत मुबंईतून आलेल्या चार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. या बाहेरून आलेल्या व्यक्तींना सक्‍तीने क्वारंटाईन करण्याचे आदेश राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत. त्याची तंतोतंत अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. जर यामध्ये हलगर्जीपणा झाला तर इंदापूर तालुक्याला कोरोनाचा विळखा बसायला वेळ लागणार नाही. अशी भावना तालुक्यातील सुज्ञ लोक करीत आहेत.