Tue, Sep 22, 2020 07:53होमपेज › Pune › सत्ताधारी नगरसेवकांचा ‘घरचा आहेर’

सत्ताधारी नगरसेवकांचा ‘घरचा आहेर’

Published On: Jan 17 2018 2:02AM | Last Updated: Jan 17 2018 12:58AM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त, आकाशचिन्ह परवाना व क्षेत्रीय अधिकार्‍यांकडेे वारंवार तक्रारी करूनही, प्रभागा क्रमांक 26 मध्ये विनापरवाना लावलेल्या फ्लेक्सवर कारवाई न केल्याने संतप्त झालेले भाजपाचे नगरसेवक तुषार कामठे यांनी वाहन भरून आणलेले फ्लेक्स पिंपरी-चिंचवड महापालिका भवनासमोर टाकून सत्ताधार्‍यांना ‘घरचा आहेर’ दिला. 

पिंपळे निलख प्रभाग परिसरातील विनापरवाना फ्लेक्स काढण्याची मागणी नगरसेवक कामठे यांनी 7 सप्टेंबर, 16 डिसेंबर 2017 व 2 जानेवारी 2018 ला आयुक्त श्रावण हर्डीकर, आकाशचिन्ह परवाना विभाग व  ‘ड’ क्षेत्रीय अधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली होती; मात्र अधिकार्‍यांनी कारवाई केली नाही. त्यामुळे नगरसेवक कामठे यांनी स्वत: पुढाकार घेऊन पिंपळे निलख व विशालनगर परिसरात पदपथांवरील विद्युत खांबांवर लावलेले फ्लेक्स काढले. ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर हे फ्लेक्स टाकून कारवाईची मागणी केली; मात्र अधिकार्‍यांनी दखल न घेतल्याने मंगळवारी (दि.16) पिंपरी-चिंचवड महापालिका भवनातील प्रवेशद्वारासमोर फ्लेक्स टाकून प्रशासनाच्या निष्क्रियतेचा नगरसेवक कामठे यांनी निषेध नोंदविला. 

यामुळे सुरक्षारक्षकांची तारांबळ उडाली. त्यांनी विरोध केला; मात्र नगरसेवक व त्यांच्या कार्यकर्त्यांनी फ्लेक्स टाकून दिले. या संदर्भात नगरसेवक कामठे यांनी सांगितले की, आयुक्तांसह आकाशचिन्ह परवाना व ‘ड’ क्षेत्रीय अधिकार्‍यांकडे वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली नाही, म्हणून पालिका भवनात फ्लेक्स आणून टाकले. अधिकारी एकमेकांवर जबाबदारी झटकत आहेत. आंदोलनाची दखल घेऊन कामचुकार अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी त्यांनी आयुक्त हर्डीकर यांच्याकडे केली आहे.