Wed, Feb 19, 2020 00:10होमपेज › Pune › अ‍ॅट्रॉसिटीच्या धाकाने डॉक्टरकडून उकळली ७५ लाखांची खंडणी

अ‍ॅट्रॉसिटीच्या धाकाने डॉक्टरकडून उकळली ७५ लाखांची खंडणी

Last Updated: Feb 11 2020 2:16AM
पुणे : पुढारी वृत्तसेवा
शहरातील एका नामांकित डॉक्टरला बलात्कार व अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवत 1 कोटी 30 लाख रुपये खंडणीची मागणी करून 75 लाख रुपये उकळण्यात आल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. राहिलेल्या 55 लाखांसाठी डॉक्टरकडे सतत तगादा लावल्याने संबंधित डॉक्टरने गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, या प्रकरणात 75 लाख खंडणी उकळणार्‍या मुख्य आरोपीकडून पोलिस मित्र म्हणविणार्‍या एका व्यावसायिक-व्यापार्‍याने त्याच्या गुन्ह्याचे बिंग फोडण्याचा धाक दाखवून 5 लाख उकळल्याचीही चर्चा आहे. मुख्य खंडणीखोर आपल्याला लुटले जात असल्याची तक्रार पोलिसांकडे केल्याने हा गुन्हा उघड झाल्याची चर्चा आहे.

याप्रकरणी मनोज अडसूळ (अत्रे) याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात फसवणूक आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत डॉ. दीपक प्रभाकर रासने (वय 69, रा. तपोवन सोसायटी, पर्वती) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार 18 ऑक्टोबर 2019 ते 6 फेब्रुवारी 2020 या कालावधीत घडला आहे. विशेष म्हणजे महिलेने विनयभंगप्रकरणी पोलिसात दिलेल्या तक्रार अर्जात तपासानंतर कोणतेही तथ्य आढळले नसल्याने तो तपास बंद करण्यात आला होता; परंतु आरोपी व त्याच्या अन्य एका साथीदाराने फिर्यादींना भीती दाखवत पैसे उकळण्यासाठी बनाव रचला असल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा डॉ. साहिल याच्याविरुद्ध ऑक्टोबर 2019 मध्ये विश्रामबाग पोलिस ठाण्यात एका महिलेने विनयभंगाचा तक्रार अर्ज दाखल केला होता. तपासणी फीच्या वादातून हा प्रकार झाला होता. त्यातूनच मनोज अडसूळ याने तुमच्या मुलावर बलात्कार, अ‍ॅट्रॉसिटी असे गंभीर गुन्हे दाखल होऊ शकतात, अशी भीती दाखवली. त्यामुळे फिर्यादीच्या मुलास 3 ते 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते, त्याला जामीनदेखील मिळणार नाही, असे अडसूळ याने धमकावले.

या सर्व संधीचा फायदा घेत आरोपीने फिर्यादींना फोन करून पोलिसांशी संबंध असणारी एक व्यक्‍ती माझ्या परिचयाची असून, ती या प्रकरणात आपल्याला मदत करेल, असे सांगितले. मात्र, आरोपीने हे प्रकरण मिटवण्यासाठी 1 कोटी 30 लाख रुपयांची मागणी केली होती. पुढे फिर्यादींना खोटे आश्‍वासन देऊन भीती घालत धनादेशाद्वारे 54 लाख आणि रोख 21 लाख रुपये, असे तब्बल 75 लाख रुपये घेतले. एवढेच नाही तर उर्वरित 55 लाखांची रक्कम घेण्यासाठी फिर्यादीच्या मुलाला अटक होईल, अशी सतत धमकी देण्यात येत होती.

पोलिस मित्रदेखील प्रकरणात सहभागी?
या प्रकरणात पोलिस मित्रदेखील जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे. शहरातील पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या संपर्कात राहून, त्यांच्या सोबतचे फोटो समाजमाध्यमावर टाकून, आपण त्यांच्या किती जवळ आहोत, आपला किती मोठा परिचय आहे हे दाखवत, या प्रकरणात त्याने मध्यस्थी केली असल्याचा उल्लेख फिर्यादींच्या जबाबात करण्यात आला आहे. आरोपीने देखील त्या ‘पोलिसप्रेमी’च्या विरुद्ध खंडणी मागून मानसिक त्रास दिल्याचा तक्रार अर्ज दाखल केला, त्यामुळे पोलिस त्याची कसून चौकशी करत आहेत.