होमपेज › Pune › पुण्यात ७० नवे रूग्ण, १८२ कोरोनामुक्त सहा जण मृत्युमुखी

पुण्यात ७० नवे रूग्ण, १८२ कोरोनामुक्त सहा जण मृत्युमुखी

Last Updated: Jun 01 2020 11:33PM
पुणे : पुढारी वृत्तसेवा

पुण्यात सोमवारी 6 कोरोनाबधितांचा बळी गेला असून, शहरात कोरोनाचे नवीन 57 रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यातील एकुण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 6 हजार 529 झाली आहे. पिंपरी चिंचवड येथे 13 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. तर 182 रुग्ण कोरोनातून बरे होउन घरी परतले आहेत, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. 

शहरात नेहमीच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटल्याचे दिसून येत असले तरी, आधीच्या दिवशी म्हणजे रविवारी दिवसभरात 359 संशयितांचे नमूने घेण्यात आल्यामुळे सोमवारी कमी रुग्णांचे निदान झाले . शहरातील सरकारी व खासगी रुग्णालये, प्रयोगशाळा येथे मिळून दररोज एक ते दीड हजार संशयितांचे नमुने तपासणीसाठी येतात. मात्र, रविवारी सूटीचा दिवस असल्याने केवळ 359 जणांचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यामुळे सोमवारी नवीन रुग्णांचा आकडा घटल्याचे दिसून येत आहे. 

सोमवारी 1 हजार 597 रुग्णांचे नमुने घेण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल मंगळवारी येणार आहे. नवीन रुग्णांची संख्या रविवारी 271 इतकी होती. मात्र, सोमवारी केवळ 57 रुग्ण आढळून आले. सोमवारी दिवसभरात 168 तर आतापर्यंत 3 हजार 950 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 2 हजार 259 रुग्णांवर उपचार सूरू आहेत. त्यापैकी 174 गंभीर तर 46 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

सोमवारी सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली असून, त्यापैकी 1 पुरूष आणि 5 महिलांचा समावेश आहे. मृतांपैकी मार्केटयार्डातील 74 वर्षीय पुरूष, कोंढव्यातील 76 वर्षीय महिला, बिबवेवाडीतील 58 वर्षीय महिला, येरवडयातील 75 वर्षीय महिला तर पांडवनगर येथील 60 आणि 74 वर्षीय दोन महिलांचा समावेश आहे. मृतांपैकी एकाच महिलेला कोणतेही जोखमीचे आजार नव्हते तर उरलेल्या सर्व रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब व इतर जोखमीचे आजार होते.