Thu, Jan 28, 2021 07:30होमपेज › Pune › एकाच दिवसात ३२ जणांचा बळी

एकाच दिवसात ३२ जणांचा बळी

Last Updated: Jul 13 2020 1:45AM
पुणे : पुढारी वृत्तसेवा

पुण्यात रविवारी दिवसभरात तब्बल 32 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यापैकी 24 पुणे शहर, तर 8 जण पिंपरी-चिंचवडमधील आहेत. पुणे-पिंपरीत 957 नवे रुग्ण आढळले असून, यापैकी पुणे शहरात 621 तर पिंपरी-चिंचवडच्या 336 रुग्णांचा समावेश आहे. गेल्या महिन्याभरातील मृतांची एका दिवसातील ही सर्वात मोठी संख्या आहे. 

महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुणे शहरात रविवारी 552 हजार संशयितांचे स्रावाचे नमुने ‘आरटीपीसीआर’ चाचणीसाठी घेण्यात आले असून, ते एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले. रविवार असल्याने आज चाचण्यांची संख्या घटली आहे. तर, त्वरित होणार्‍या अँटिजेन चाचणीसाठी 962 नमुने घेण्यात आले. याआधी घेतलेल्या नमुन्यांपैकी आज 621, तर आतापर्यंत 27,525 नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत. दिवसभरात 486, तर आतापर्यंत 17, 482 कोरोनातून बरे झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या शहरात 9,203 रुग्णांवर (अ‍ॅक्टिव्ह रुग्ण) उपचार सुरू आहेत. त्यापैकी 487 रुग्ण गंभीर असून, 172 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

रविवारी पुणे शहरात 24 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, त्यापैकी 14 पुरुष, तर 10 महिला आहेत. या मृतांचे वय 38 ते 80 च्या दरम्यान होते. हे रुग्ण कर्वेनगर, शिवाजीनगर, वडगाव बुद्रुक, माणिकबाग (सिंहगड रोड), बिबवेवाडी, ससाणेनगर, कात्रज, फुरसुंगी, येरवडा, हडपसर, कोंढवा, धनकवडी, घोरपडी पेठ, सदाशिव पेठ, बुधवार पेठ, उंड्री आणि कर्वेनगर या परिसरातील रहिवासी होते. त्यापैकी काहींना उच्च रक्तदाब, मधुमेह हे जोखमीचे आजारही होते. आता शहरातील एकूण मृतांची संख्या 840 वर पोचली आहे.

    पिंपरी-चिंवड शहरात कोरोनाचे 336 नवे रुग्ण आढळले असून, पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 7,450 झाली आहे.  683  संशयितांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या 410 जणांना क्वारंटाईन करण्यात आले असून, कोरोनातून बरे झालेल्या 318 जणांना घरी सोडण्यात आले. तर, पिंपरीतील पुरुष (60), आकुर्डीतील 2 पुरुष (43 व 68), सांगवीतील पुरुष (57), चर्‍होलीतील महिला (61), मारुंजीतील पुरुष (48), देहूरोडमधील महिला (46) आणि बीडमधील पुरुष (95) या 8 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.