Wed, Aug 12, 2020 09:23होमपेज › Pune › पुण्याच्या इतिहासातील २७/११

पुण्याच्या इतिहासातील २७/११

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : महेंद्र कांबळे 

इतिहासातील काही घटनांचे चरे चाळीस-पन्नास वर्षांनंतरही कायम असतात. पुण्याच्या इतिहासात पानशेत पुराप्रमाणे जोशी - अभ्यंकर हत्याकांडाची घटना अशीच अविस्मरणीय ठरली आहे. पुण्याला हादरवून टाकलेल्या या हत्याकांडाला तब्बल चाळीस वर्षे उलटली, पण कुठेही तिचा संदर्भ चर्चेत आला तर आजही जुन्या पिढीतील पुणेकरांच्या अंगावर त्या दिवसांच्या आठवणीने अंगावर शहारा उभा राहतो. हे हत्याकांड घडवणार्‍या चार युवकांना फाशी देण्यात आली, त्या दिवशी हजारो पुणेकरांनी सोडलेला निःश्वास आजही अनेकांना आठवेल. राजेंद्र जक्कल, दिलीप सुतार, शांताराम जगताप आणि मुनव्वर शाह या चौघांना 27 नोव्हेंबर 1983 रोजी येरवड्याच्या तुरुंगात फाशी देण्यात आली. या ’पूर्णविरामा’ला आज चौतीस वर्षे होत आहेत. चाळीस वर्षांपूर्वीचा तो सारा कालखंड पुणेकरांच्या डोळ्यांसमोर उभा करणारा हा एक अविस्मरणीय दिवस! 

ऑक्टोबर 1976 मध्ये प्रकाश हेगडेच्या ’बेपत्ता’ होण्यापासून सुरु झालेले हे खुनाचे सत्र वर्षभरात जोशी कुटुंबातील तीन (अच्युत, उषा आणि आनंद), अभ्यंकर कुटुंबातील पाच (काशिनाथशास्त्री, इंदिराबाई, त्यांचा नातू धनंजय, नात जाई असे चौघे आणि कर्मचारी सखुबाई) आणि अनिल गोखले अशा तब्बल दहाजणांच्या गूढ हत्येनंतर अभिनव कला महाविद्यालयातील चार विद्यार्थ्यांच्या अटकेनंतर थांबले होते. मात्र पुणेकरांनी सुटकेचा श्वास टाकला, तो या चौघांना फाशी दिल्यानंतरच. या घटनेमुळे निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेचे दडपण एवढे मोठे होते की, आज ’फास्ट ट्रॅक’ म्हटली जाणारी संकल्पना तेव्हा अस्तित्वात नसूनही सत्र न्यायालय, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, दयेचा अर्ज वगैरे सारे सोपस्कार अमलात येऊनही चार वर्षांत फाशी देण्यात आली होती. सर्वात कमी कालावधीत अमलात आलेल्या या फाशीचे स्मरण 26/11 च्या घटनेतील कसाबला याच तुरुंगात फाशी देतानाही अनेकांना झाले असेल. 

आरोपी राजेंद्र जक्कल, दिलीप सुतार, शांताराम जगताप, मुनव्वर शहा या चौघांना 28 सप्टेंबर 1978 साली फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.दि. 15 जानेवारी 1976 ला प्रसिद्ध ‘हॉटेल विश्व’चे मालक हेगडे यांच्या मुलाचे अपहरण झाले.  

त्यानंतर  आठ महिन्यांनी 31 ऑक्टोबर 1976ला विजयानगर कॉलनीमध्ये राहणार्‍या अच्युत जोशी, पत्नी उषा, मुलगा आनंद यांचा त्यांच्या राहत्या घरी खून झाला. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी खून केल्यानंतर आरोपींनी घरामध्ये अनेक अत्तरे एकत्र करून तयार केलेले मिश्रण वापरले होते. या गुढ खुनांच्या दहशतीमुळे पुण्यात त्यावेळी संध्याकाळी सातनंतर कोणी घराबाहेर पडेनासे झाले होते. 

1 डिसेंबर 1976रोजी  झालेल्या घटनेने क्रुरतेचा कळस गाठला. काशिनाथशास्त्री अभ्यंकर यांचा त्यांच्या पत्नी इंदिराबाई, नातू धनंजय, नात जाई आणि त्यांच्या घरात काम करणार्‍या सखूबाई वाघ या पाच जणांचा खून झाला. हे पाच खून आणि जोशी दाम्पत्याच्या खुनात साधर्म्य होते. त्यामुळे हे एकाच टोळीचे कृत्य असल्याची पोलिसांची खात्री पटली. तरीही खुन्यांपर्यंत पोहचण्यास पोलिस अपयशी ठरत होते. 

चार महिन्यांनी अनिल गोखले या तरुणाचा अशाच पद्धतीने खून झाला. त्याचा मृतदेह बंडगार्डन जवळ नदीमध्ये एका लोखंडी शिडीला बांधून नदीत बुडविण्यात आल्याचे पोलिसांना आढळले होते. 24 मार्चला अनिलचा मृतदेह नदीत सापडला. त्यानंतर पोलिसांकडे वारंवार चौकशीला येणारी जक्कल-सुतार चौकडी मात्र, त्यांच्या एका चुकीमुळे अलगद पोलिसांच्या जाळ्यात सापडली आणि पुढे अल्पावधीतच सर्व हत्यांचा तपास पुर्ण होऊन वर्षभरात सत्र न्यायालयात खटला चालवला गेला आणि फाशीची शिक्षाही ठोठावली गेली.