मार्चसाठी 21 लाख टन साखरेचा कोटा खुला

Last Updated: Feb 28 2021 1:45AM
Responsive image
पुणे :  

केंद्र सरकारने मार्च महिन्यासाठी 21 लाख टन इतका साखरेचा कोटा खुला केला आहे. सण, उन्हाळा, लग्नसराईमुळे साखरेस मोठी मागणी राहण्याची अपेक्षा आहे. तरीसुद्धा मागणीच्या तुलनेत मुबलक कोटा देण्यात आला असून तूर्तास घाऊक बाजारपेठेवर कोणताच परिणाम झालेला नाही. साखरेचा प्रतिक्विंटलचा भाव 3250 ते 3300 रुपयांवर स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

मार्च महिन्यात महाशिवरात्री, होळी, धुलिवंदन, लग्नसराई, यात्रा-जत्रांमुळे साखरेला चांगली मागणी असते. दुसरीकडे उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. त्यामुळे शीतपेय, आइस्क्रीम उत्पादकांकडून साखरेला मागणी वाढण्याची अपेक्षा घाऊक बाजारपेठेतील व्यापार्‍यांकडून वर्तविण्यात आली.

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील काही खासगी कारखान्यांकडून कमी भावातील साखरेची विक्री सुरूच असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. केंद्राने साखरेचा प्रतिक्विंटल विक्रीचा भाव 3100 रुपये निर्धारित केलेला आहे. त्यापेक्षा कमी भावात साखर विक्री कायद्यांन्वये करता येत नाही. प्रत्यक्षात व्यवहार याच भावाने होत असला तरी क्विंटलला 2900 रुपयांनी साखर मिळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कारखान्यांतून साखर बाजारात येईपर्यंत हमाली, वाहतूक भाड्याचा खर्च वेगळा आहे. मात्र खरेदीदारास क्विंटलला दोनशे रुपयांची जादा साखर अ‍ॅडजस्ट करून दिली जात असल्याची चर्चा आहे. 3100 रुपयांवर होणार्‍या पाच टक्के जीएसटी कराचे 155 रुपयांचा भरणा केला जात असल्याने याची तपासणी करायची कशी, असा प्रश्न निर्माण झाल्याचे समजते. त्यामुळे साखर आयुक्तालय याची तपासणी करून संबंधितांवर कारवाई कशी करणार, हे एक आव्हानच आहे.