Thu, Aug 06, 2020 03:44होमपेज › None › ब्रिजेश यादवचा विजयी पंच, दुस-या फेरीत प्रवेश

ब्रिजेश यादवचा विजयी पंच, दुस-या फेरीत प्रवेश

Published On: Sep 11 2019 7:37PM | Last Updated: Sep 11 2019 7:36PM
एकॅटेरिनबर्ग (रशिया) : पुढारी ऑनलाईन

रशियातील एकॅटेरिनबर्ग येथे सुरू झालेल्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत भारताने चांगली सुरुवात केली आहे. या स्पर्धेच्या ८१ किलो वजनी गटात ब्रिजेश यादवने मंगळवारी पोलंडच्या मेलुझ गोइन्स्की याचा एकतर्फी सामन्यात ५-० ने पराभव केला. स्पर्धेतील सलामीच्या लढतीत पोलंडच्या खेळाडूने चांगला पंच लगावले. पण, ब्रिजेशने चपळ हालचालींसह प्रतिस्पर्धी खेळाडूवर सातत्याने आक्रमक पंचचा मारा केला. ब्रिजेशच्या पंचने गोइन्स्की जखमीही झाला. यंदा थायलंड आणि इंडिया ओपनमध्ये ब्रिजेशने रौप्य पदकाची कमाई केली आहे. 

ब्रिजेशचा आता राउंड ३२ मध्ये तुर्कीच्या बायरम मालकान याच्याशी सामना होणार आहे. हा सामना रविवारी होणार आहे. भारताचे तीन बॉक्सर अमित पन्हाळ (५२ किलो), कवींदरसिंग बिष्ट (५७) आणि आशिष कुमार (७५) यांना पहिल्या फेरीत बाय मिळाला. यंदाच्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत ऑलंम्पिकमधील आठ प्रकारांचे सामने खेळले जात आहेत. या आधीच्या स्पर्धेत १० प्रकारांचा समावेश होता. पुरुष खेळाडूंनी आतापर्यंत जागतिक स्पर्धेत कधीही सुवर्णपदकाला गवसणी घालू शकलेले नाहीत.

प्रथमच खेळाडूंचा डेटा तयार होणार 

रशियाच्या बॉक्सिंग फेडरेशनने स्पर्धेदरम्यान प्रत्येक खेळाडूचा डेटा तयार करण्यासाठी स्टॅटिस्पोर्टशी करार केला आहे. त्याअंतर्गत प्रत्येक सामन्यातील खेळाडूंची कामगिरी जमा केली जाईल. जागतिक स्पर्धेत प्रथमच याचा उपयोग होत आहे. यामुळे प्रत्येक खेळाडूला त्याचा खेळ आणखी सुधारण्याची संधी मिळणार आहे.