Fri, May 07, 2021 17:56होमपेज › None › प्रेषितांचे व्यंगचित्र दाखवणार्‍या शिक्षकाचा फ्रान्समध्ये गळा चिरला

मोहम्मद पैगंबरांचे व्यंगचित्र दाखवल्याच्या कारणावरून शिक्षकाचा गळा चिरला

Last Updated: Oct 18 2020 1:13AM
पॅरिस : वृत्तसंस्था

अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याचा धडा शिकविताना वर्गातील विद्यार्थ्यांना मोहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र दाखवल्याचा राग आल्याने एका दहशतवाद्याने शिक्षकाचा गळा चिरल्याची धक्‍कादायक घटना पॅरिसमध्ये घडली. घटनास्थळी दाखल पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत या दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला.

शिक्षकाचा गळा चिरण्यापूर्वी दहशतवाद्याने काही इस्लामिक घोषणाही दिल्याचे समजते. मृत दहशतवाद्याचा कुठल्या संघटनेशी संबंध आहे, याचा तपास सुरू आहे. वर्गात अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याबाबतचा धडा शिकवताना 47 वर्षीय शिक्षकाने ‘चार्ली हेब्दो’ या साप्ताहिकामध्ये प्रकाशित झालेले प्रेषित मोहम्मद यांचे व्यंगचित्र दाखवले. त्याआधारे त्यांनी अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याचे काही मुद्दे मांडले. 

दहशतवादी युवकाचे वय 18 वर्षे आहे. त्याला शरण येण्यास पोलिसांनी बजावले; पण त्याने पोलिसांवर बंदूक ताणली आणि पोलिसांच्या दिशेने तो गोळ्या झाडू लागला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो ठार झाला.

शिक्षकाच्या हत्येनंतर फ्रान्समध्ये राजकीय वातावरण तापले आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूअल मॅक्रॉन हे शिक्षकाच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. राष्ट्रपती मॅक्रॉन यांनी या घटनेवर संताप व्यक्‍त केला आहे. ही घटना म्हणजे इतिहासाची हत्या आहे. दहशतवाद्यांनी देशाच्या लोकशाही प्रजासत्ताक धोरणावरच हल्ला केला आहे, अशी प्रतिक्रिया मॅक्रॉन यांनी व्यक्‍त केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका अल्पवयीन मुलासह 4 जणांना अटक केली आहे. मारेकरी रशियातील चेचेन्यातील रहिवाशी होता, असे समोर आले आहे. रशियन गुप्तचर संस्थेला ही बाब कळविण्यात आली आहे. रशियाच्या चेचेन्या भागात दहशतवादी आणि रशियन सैन्यामध्ये सातत्याने चकमकी होत असतात.

दहशतवाद्याने डोके धडावेगळे केले, त्या शिक्षकाचे नाव सॅम्युएल पॅटी असल्याचे समोर आले आहे. सॅम्युएल पॅटी यांच्या हत्येचा बहुतांश युरोपिय देशांतून निषेध करण्यात येत आहे. ते इतिहास हा विषय शिकवत असत.

‘चार्ली हेब्दो’वरील हल्ल्याचे स्मरण

प्रेषितांचे व्यंगचित्र प्रकाशित केल्यानंतर 7 जानेवारी 2015 रोजी ‘चार्ली हेब्दो’च्या पॅरिस येथील कार्यालयावर दोघा दहशतवाद्यांच्या अंदाधुंद गोळीबारामध्ये 17 जण ठार झाले होते. नंतर आठवडाभरात हे साप्ताहिक पुन्हा सुरू करण्यात आले आणि त्याचा खप 10 हजार प्रतींवरून थेट दोन लाख प्रतींवर पोहोचला होता.