अहमदाबाद : पुढारी ऑनलाईन
जम्मू-काश्मीरचा प्रश्न हाताळण्यात भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू चुकीचे होते, तर देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल बरोबर होते, असे मत केंद्रीय केंद्रीय कायदे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या दुसर्या कार्यकाळातील पहिले १०० दिवस नुकतेच पूर्ण झाले. त्या निमित्त अहमदाबाद येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे कौतुक करत काश्मीर खो-यातील विकासाला आता यापुढे चालना मिळणार असल्याचेही सांगितले.
मोदी सरकारच्या दुसर्या कार्यकाळाचे १०० दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सरकारच्या कामगिरीविषयी रविशंकर प्रसाद यांनी माहिती देताना जम्मू-काश्मीरविषयीची केंद्र सरकारच्या भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, जम्मू-काश्मीरचा प्रश्न हताळण्यात सरदार पटेल यांची भूमिका योग्य होती, तर माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू चुकीचे होते. कलम ३७० ही ऐतिहासिक चूक होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही ऐतिहासिक चूक दुरुस्त करून अदम्य धैर्य दाखवले आहे.
ते पुढे म्हणाले की, गेल्या महिन्यात घटनेतील वादग्रस्त कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये एकही गोळी झाडली गेलेली नाही. जम्मू-काश्मीरच्या १४ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भाग वगळता इतर सर्व भागातून कर्फ्यू हटविण्यात आला आहे. येथील परिस्थिती सामान्य होत चाललेली आहे. सरकारच्या निर्णयाचे काश्मीर खो-यातील नागरिकांनी स्वागत केले असून त्यांच्या नजारा आता सरकारच्या विकासात्मक भूमिकेकडे लागून आहेत.