इंडियन मुजाहिद्दीनचा नेपाळमध्ये सर्वात मोठा तळ

Last Updated: Nov 12 2019 1:28AM
Responsive image


वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन 

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने दहशतवादासंदर्भात ‘कंट्री रिपोर्ट ऑन टेररिजम २०१८’ हा महत्त्वपूर्ण अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात इंडियन मुजाहिद्दीन (आयएम) या दहशतवादी संघटनेबाबत मोठा खुलासा झाला आहे. १ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या या अहवालानुसार, आयएमने नेपाळमध्ये सर्वात मोठा तळ बनविला असून भारताविरूद्ध मोठी दहशतवादी घटना घडवण्याचा त्यांचा मनसूबा आहे. याचबरोबरच ‘आयएम’ने पाकिस्तानी दहशतवादी संघटना लश्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हरकत उल-जिहादी इस्लामी यांच्याशीही हातमिळवणी केल्याचेही सुत्रांनी सांगितले आहे.

अहवालानुसार, इंडियन मुजाहिद्दीनचे पहिले लक्ष्य भारत आहे. त्यामुळेच या दहशतवादी संघटनेने आपली व्याप्ती वाढवून भारताच्या शेजारील राष्ट्र नेपाळच्या धर्तीवर सर्वात मोठे केंद्र बनवले आहे. या केंद्रासाठी ‘आयएम’ला पाकिस्तानसह मध्य पूर्व देशांकडून मोठ्याप्रमाणावर आर्थिक मदत मिळत आहेत. तसेच, पाकिस्तान आपल्या भूमीवर दहशतवाद्यांना मिळत असलेला निधी, भरती आणि प्रशिक्षण रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरला आहे. अफगाण तालिबान आणि हक्कानी नेटवर्कसाठी पाकिस्तान एक सुरक्षित आश्रयस्थान आहे. पाकिस्तानच्या राजकारण्यांनी उघडपणे तालिबान्यांचे समर्थन केले आहे. बलूचिस्तान आणि सिंध प्रांतातील दहशतवादी संघटना सातत्याने सरकारी, अशासकीय संस्था यांना लक्ष्य करीत आहेत.

आयएमकडून २००५पासून भारताला हादरे देत आहे. ज्यात शेकडो निष्पाप लोकांचे प्राण गेले आहेत. फॉरेन टेररिस्ट ऑर्गनायझेशन (एफटीओ)ने ११ सप्टेंबर २०११ रोजी इंडियन मुजाहिद्दीनला आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना घोषित केले आहे.