मयंकची शानदार शतकी खेळी

Last Updated: Oct 10 2019 3:42PM
Responsive image


पुणे : पुढारी ऑनलाईन 

संयमी पण तितक्याच आक्रमकतेने फटकेबाजी करून टीम इंडियाचा सलामीवीर मयंक अग्रवालने द. आफ्रिकेविरुद्धच्या दुस-या कसोटीत सलग दुसरे कसोटी शतक फटकावले आहे. ९९ धावसंख्येवर असताना त्याने फिलँडरला एक शानदार चौकार ठोकून १८३ चेंडूत १०३ धावांची खेळी पूर्ण केली. मात्र, त्यानंतर ५ धावांची भर घालून तो १०८ (१९५ चेंडू, १६ चौकार आणि २ षटकार) धावांवर बाद झाला. रबाडाने डु प्लेसिस करवी मयंकला झेलबाद केले. भारताला हा तिसरा धक्का आहे. आता कर्णधार विराट कोहली व अजिंक्य रहाणे मैदानावर असून मोठी धावसंख्या उभा करण्याचे त्यांच्यासमोर आव्हान आहे. 

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटीस आज पुण्यातील महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरुवात झाली. भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, १० व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर रोहित शर्मा बाद झाला. रबाडाने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. यानंतर न डगमगता मयंक अग्रवालने चेतेश्वर पुजाराच्या सहाय्याने सयंमी खेळ करत उपहारानंतर अर्धशतक झळकावले. त्यानंतर चेतेश्वर पुजारानेही आपले कसोटीतील अर्धशतक पूर्ण करून संघाचा दिडशे धावांचा टप्पा पार करून दिला. मात्र, चेतेश्वर पुजाराच्या रुपाने भारताला दुसरा धक्का बसला. अर्धशतक पूर्ण करताच काही वेळात तो बाद झाला. रबाडानेच पुजाराची विकेट मिळविली. डु प्लेसिसने पुजाराचा झेल पकडला. मयंक व पुजाराने १३८ धावांची भागिदारी केली.

वीरेंद्र सेहवागशी बरोबरी...

सलग दोन कसोटी सामन्यांत दोन शतक ठोकून मयंकने माजी कसोटी सलामीवीर वीरेंद्र सेहवागशी बरोबरी केली आहे. मयंकच्या आधी वीरेंद्र सेहवागने २००९-१० मध्ये सलग दोन कसोटी शतके झळकाविली होती. 

रबाडा ऑन फायर... 

दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडाने गोलंदाजीत आक्रमक गोलंदाजीचे प्रदर्शन करत टीम इंडियाचे पहिले तिन्ही फलंदाज बाद केले. त्याने रोहित शर्माला बाद करून भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर चेतेश्वर पुजारा व मयांकला बाद केले. रबाडाने आतापर्यंत टाकलेल्या १६ षटकांमध्ये २.६२ च्या सरासरीनं अवघ्या ४२ धावा दिल्या असून तीन बळी टिपले आहेत.

रोहित १४ धावांवर बाद...

सलामीवीर रोहित शर्मा आणि मयंक अग्रवालने भारताच्या पहिल्या डावाची सुरुवात केली. मात्र, १० व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर रोहित शर्मा अवघ्या १४ धावांवर बाद झाला. द. आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज रबाडाने संघाला पहिले यश मिळवून देत भारताला पहिला धक्का दिला. त्याने रोहितला आपल्या जाळ्यात पकडून डि कॉककडे झेल देण्यास भाग पाडले. यावेळी भारताची धावसंख्या २५ होती.

रबाडाचे जाळे... आणि रोहित सापडला... 

भारताच्या डावाचे १० वे षटक सुरू होते. रबाडाच्या हाती चेंडू होता. त्याचे हे वैयक्तीक पाचवे षटक होते. या षटकाच्या अखेरचा चेंडू त्याने अखूड टप्प्याचा टाकला. यावर बचावात्मक पवित्रा घेत असतानाच रोहित फसला आणि बॅटची बाह्य किनार घेऊन चेंडू थेट यष्टिरक्षक क्विंटन डी कॉकच्या हाती गेला. मागिल कसोटीच्या दोन्ही डावात शतक झळकावणा-या रोहितकडून याही सामन्यात मोठ्या खेळीची अपेक्षा होती, मात्र रोहित यात अपयशी ठरला.

भारतीय संघात एक बदल

भारतीय संघात एक बदल करण्यात आला आहे. या कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाज उमेश यादवला संधी देण्यात आली असून हनुमा विहारीला विश्रांती दिली आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेने वेगवान गोलंदाज एनिच नॉर्टजेला संघात स्थान दिले आहे. पुण्याची विकेट फलंदाजांना उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पहिल्या कसोटीत आपल्या बॅटमधून धावांची आतषबाजी करणा-या सलामीवीर रोहित शर्मा व मयांक अग्रवाल यांच्याकडून याही कसोटीत मोठ्या धावसंख्येची अपेक्षा आहे. 

विशाखापट्टणम येथील पहिल्या कसोटी सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर २०३ धावांनी दणदणीत विजय मिळवून मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.  

पहिल्या कसोटीत रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, रवींद्र जडेजा, आर. अश्विन आणि मोहम्मद शमी यांनी शानदार कामगिरी करत टीम इंडियाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला होता. 

भारतीय संघ...

मयांक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, वृद्धीमान सहा (यष्टीरक्षक), आर अश्विन, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद शमी 

दक्षिण आफ्रिका संघ...

फाफ डू प्लेसिस (कर्णधार), आयडन मार्क्राम, डीन एल्गर, तेन्बा बावुमा, थेयनिस डी ब्रूयन, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), झुबेर हमझा, वर्नॉन फिलँडर, केशव महाराज, डॅन पिट, कॅगिसो रबाडा