होमपेज › None › भारताने पाकिस्तानला चिरडले

भारताने पाकिस्तानला चिरडले

Published On: Aug 14 2019 9:00PM | Last Updated: Aug 14 2019 9:00PM
लंडन : वृत्तसंस्था

भारताचे नंदनवन म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 रद्द झाले आहे. यामुळे पाकिस्तानचा तिळपापड होत आहे. याप्रश्‍नी पाकला आंतरराष्ट्रीय स्तरावर आपटी मिळत आहे. अशातच भारतीय संघाने दिव्यांग टी-20 वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेतील एका सामन्यात पाकिस्तानला आठ विकेटस्ने चिरडून एकतर्फी विजय मिळवत फायनलमध्ये धडक मारली. उल्लेखनीय म्हणजे भारताच्या विजयाचा शिल्पकार काश्मिरी क्रिकेटर वासिम इकबाल ठरला. त्यानेही हा विजय आपल्यासाठी खास असल्याचे म्हटले आहे.

इंग्लंडमध्ये सध्या दिव्यांग टी-20 वर्ल्ड चॅम्पियनशिप क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेंतर्गत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला. यामध्ये भारताने पाकचा आठ विकेटने एकतर्फी पराभव केला. वासिम इकबालने भारताला विजय मिळवून देताना 43 चेंडूंत 69 धावांची खेळी साकारली. या खेळीमुळे त्याला ‘सामनावीर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सामना 
वुर्सेस्टरशायरच्या कौंटी मैदानावर खेळविण्यात आला. 

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 20 षटकांत 7 बाद 150 धावा काढल्या. पाकच्या हमीदने सर्वाधिक 30 धावा काढल्या. तर, भारताच्या व्ही. आर. केनीने 15 धावांत 2 विकेट घेत पाकच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. विजयासाठी 151 धावांचे टार्गेट नजरेसमोर ठेवून उतरलेल्या भारताच्या 25 वर्षीय वासिमने 43 चेंडूंत 6 षटकार व 4 चौकारांच्या मदतीने 69 धावांची स्फोटक खेळी केली. तर, कुणाल फणसेने 47 चेंडूंत 55 धावांची अर्धशतकी खेळी साकारली. भारताने 17.1 षटकांत 2 विकेटस्च्या मोबदल्यात विजयावर शिक्‍कामोर्तब करून अंतिम फेरीत प्रवेश केला.