Sun, Sep 20, 2020 03:32होमपेज › None › चिन्यांकडून १९६२ ची पुनरावृत्ती, सीमेवर लाऊडस्पीकरवर लावली पंजाबी गाणी

चिन्यांकडून १९६२ ची पुनरावृत्ती, सीमेवर लाऊडस्पीकरवर लावली पंजाबी गाणी

Last Updated: Sep 17 2020 11:41AM
नवी दिल्ली :  पुढारी ऑनलाईन

लडाखमधील LAC वर भारत आणि चीनमधील संघर्ष सातत्याने वाढत आहे. दरम्यान चिन्यांनी भारताविरूद्ध आक्रमक वृत्ती अवलंबली आहे. भारतीय सैन्याच्या प्रतिउत्तरामुळे आतापर्यंत चीनच्या हाती काहीच लागलेले नाही. दरम्यान, पीपल्स लिबरेशन आर्मीकडून (PLA) भारतीय सैन्याला भडकवण्यासाठी पंजाबी गाण्यांचा वापर केला जात आहे. पँगोंग त्सो  भागात मोठ्या आवाजात लाऊडस्पीकरवर पंजाबी गाणी लावली जात आहेत.

भारतीय सैन्याला भडकवण्यासाठी असली कृत्ये करत असल्याचे सांगण्यात येत आहे. चीनने फिंगर क्षेत्राचा ताबा घेतल्यानंतर भारतीय लष्कर सतर्क झाले आहे. अशा परिस्थितीत चीन भारतीय जवानांची एकाग्रता भंग करण्यासाठी असली कृत्ये करत आहेत. जेणेकरून ते या क्षेत्राला वेढा घालण्याच्या योजनेत यशस्वी होऊ शकतील.  चिन्यांनी लाऊडस्पीकर बसविलेल्या भागावर भारतीय सैन्याची करडी नजर आहे.

चिन्यांकडून केवळ लाऊडस्पीकरद्वारे पंजाबी गाणी लावली जात नाही तर भारतीय नेत्यांची भाषणेही लावत असल्याचे समजते आहे. हिवाळ्याच्या संपूर्ण काळात जवानांना तैनात ठेवण्यासाठी हिंदीमध्ये सांगितले जात असल्याची भाषणे लावली जात आहेत. चीनला असे करुन भारतीय सैन्यांचे मनोबल कमी करायचे आहे आणि हिवाळ्यातील गरम खाणे व उबदार राहण्याचा मुद्दा उपस्थित करून भारतीय जवानांची द्विदा अवस्था करण्याचा प्रयत्न चीनकडून केला जात आहे.

१९६२ मध्येही चीनने अशीच पद्धत वापरली होती. पिपल्स लिबरेशन आर्मीने १९६२ च्या युद्धाच्या अगोदरही पश्चिम आणि पूर्व क्षेत्रात अशा युक्त्यांचा प्रयत्न केला होता. याशिवाय १९६७ च्या नाथूला भागातील चकमकीत चीनने असेच प्रयत्न केले. पण यावेळी पँगोंग खोऱ्यातील तैनात भारतीय सैन्याने आधीच निश्चय केला असल्याचे माजी भारतीय लष्करप्रमुख यांनी सांगितले.

२९ आणि ३० ऑगस्ट रोजी पँगोंग भागाच्या दक्षिणेकडील रेजांग परिसरातील भारतीय सैन्याच्या कारवाईने चिनी सैन्य संतापले आहे. अशा परिस्थितीत भारताला भडकवण्यासाठी सतत नवीन प्रयत्न केले जात आहेत. चीनने पहिल्यांदा या ठिकाणी शस्त्रे आणि रिकाम्या टाक्या आणून भारताला चिथावणी देण्याचा प्रयत्न केला. परंतु भारतीय लष्कराकडून आम्हीही तयार असल्याचे दाखवून दिल्याने त्यांचा डिवचण्याचा प्रयत्न पुर्णपणे फसत आहे.

 "