Sat, Nov 28, 2020 19:31होमपेज › None › पाकिस्तानला UN चा पुन्हा झटका

पाकिस्तानला UN चा पुन्हा झटका

Published On: Sep 11 2019 5:59PM | Last Updated: Sep 11 2019 6:04PM

युएनचे महासचिव अँटोनियो गुटेरेसनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. त्यामुळेच पाककडून सातत्याने जम्मू-काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय मंचांवर उपस्थित केला जात आहे. मात्र, त्यांना सर्व बाजूंनी निराशा हाती लागली आहे. आता युएनचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांच्याकडूनही पाकिस्तानला निराश व्हावे लागले आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या महासचिवांनी जम्मू-काश्मीर मुद्यावर मध्यस्थी करण्यास नकार दिला आहे असून भारत आणि पाकिस्तान यांनी द्विपक्षीय चर्चेच्या माध्यमातून वाटाघाट करावी व हा प्रश्न निकाली काढला जावा, असे गुटेरेस यांनी म्हटले आहे.  

वास्तविक, संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानचे प्रतिनिधी मलिहा लोधी यांच्या वतीने अँटोनियो गुटेरेस यांच्यासमोर जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावर युएनचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांचे प्रवक्ते स्टेफिन दुजारेक यांनी मत मांडत, भारत व पाकिस्तानने आक्रमक वृत्ती टाळून द्वीपक्षीय चर्चेला प्राधान्य द्यावे. ही चर्चा सकारात्मक दिशेने करून जम्मू-काश्मीरचा प्रश्न सोडवावा. 

गेल्या महिन्यात जी ७ शिखर परिषदेदरम्यान युएन महासचिव अँटोनिओ गुटेरेस व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली होती. तसेच पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनीही गुटेरेस यांची भेट घेतली होती. 

बुधवारी पाकच्या मलिहा लोधी यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या महासविवांची भेट घेऊन जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. या बैठकीनंतर मीडियाशी संवाद साधताना युएन महासचिवांचे प्रवक्ते म्हणाले की,जम्मू-काश्मीर मुद्यावर मध्यस्थि करण्याबाबत संयुक्त राष्ट्र संघाची स्थिती पूर्वीप्रमाणे आहे. दोन्ही पक्षांकडून मध्यस्थीबाबतचा मुद्दा उपस्थित केला गेल्यास त्यानंतर पुढील विचार केला जाईल. 

जम्मू-काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत (यूएनएचआरसी) पाकिस्तानने उपस्थित केल्यावर संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांचे हे विधान पुढे आले आहे. तथापि, तेथेही भारताने पाकिस्तानला कडक प्रत्युत्तर देत म्हटले की, कलम ३७० हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे.

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत जम्मू-काश्मीरच्या मुद्यावर भारताने पाकिस्तानच्या खोट्या गोष्टी एक-एक करून उघड केल्या. भारताच्या वतीने परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिवांनी सांगितले की, भारताने जम्मू-काश्मीरबाबत ठोस भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या दहशतवादी योजना यापुढे यशस्वी होणार नाहीत हे पाकने ओळखले आहे. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये हिंसा भडकवण्यासाठी पाकिस्तान प्रयत्न करत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. 

विशेष म्हणजे या महिन्यातच भारत आणि पाकिस्तानचे पंतप्रधान संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला संबोधित करणार आहेत. नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांच्या भाषणाची वेळही जवळपास आहे. त्यामुळे आता संपूर्ण जगाचे लक्ष भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या अभिभाषणाकडे लागले आहे.