Sat, Sep 19, 2020 10:18होमपेज › None › रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी टोचून घेतली कोरोना प्रतिबंधक लस!

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी टोचून घेतली कोरोना प्रतिबंधक लस!

Last Updated: Jul 22 2020 10:09PM

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीननवी दिल्ली ः वृत्तसंस्था

जीवघेण्या कोरोना विषाणूचा नाश करणारी लस शोधून काढण्याची प्रमुख देशांत अहमहमिका लागलेली असताना, लस संशोधनात आघाडी घेतल्याचा दावा करणार्‍या रशियाने गत एप्रिल महिन्यातच देशातील काही उच्चभ्रू लोकांवर लसीची चाचणी केल्याचे वृत्त आहे. मीडिया कंपनी ‘ब्लूमबर्ग’च्या अहवालात ही लस खुद्द रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी टोचून घेतल्याची शक्यता वर्तवल्यानंतर एकच चर्चा सुरू झाली आहे.

तथापि, पुतीन यांचा ही लस टोचून घेणार्‍यांमध्ये समावेश होता, हे निश्‍चित सांगता येत नाही, असेही ‘ब्लूमबर्ग’ने म्हटले आहे. रशियन हॅकर्सनी लस संशोधन डाटा चोरण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडा या तीन देशांनी अलीकडेच केला होता. कोरोनावरील पहिली लस शोधल्याचा मान मिळवण्याची स्पर्धा जगात  लागली आहे. रशियादेखील त्यात सामील आहे. तिसर्‍या टप्प्याच्या परिणामांची वाट न बघता पुढील महिन्यात मोठ्या प्रमाणावर लोकांना ही लस टोचण्याचा चंगच रशियाने बांधला आहे. 

गॅमालिया इन्स्टिट्यूटने 40 प्रभावशाली व्यक्‍तींवर लसीची चाचणी केली. पहिल्याच टप्प्यातील या चाचणीचे परिणाम जाहीर करण्यात आले नाहीत. मात्र, दुसर्‍या टप्प्याची चाचणी सुरू करण्यात आली. या दुसर्‍या टप्प्याची चाचणी यशस्वी झाल्याचा दावा रशियाने केला असून, 12 ऑगस्टपासून रशियातील नागरिकांचे कोरोना लसीकरण करण्यात येईल, असे रशियाने जाहीरही करून टाकले आहे.

या लस संशोधनाला आर्थिक पाठबळ थेट रशियन सरकारनेच दिले आहे तसेच लष्कराचाही आशीर्वाद आहे. लष्करी जवानांवर गेल्या आठवड्यातच पहिल्या टप्प्याची चाचणी झाली. दुसरा टप्पाही सुरू झाला आहे.

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तिसर्‍या टप्प्याची चाचणी सुरू होणार आहे. मात्र, त्याचवेळी सामान्य जनतेसाठी लस उपलब्ध होऊ शकते. रशियाखेरीज या लसीची चाचणी सौदी अरेबिया आणि संयुक्‍त अरब अमिरातीतदेखील सुरू आहे.

शेकडो उच्चभ्रू रशियन लोकांना लस देण्यात आल्याची खात्री ‘ब्लूमबर्ग’ने केली. मात्र, त्यांची नावे गुप्‍त ठेवण्यात आली. हे लोक कोणत्याही अधिकृत अभ्यासाचा भाग नव्हते. मात्र, ते चाचणीत सहभागी झाल्याने परिणामांवर लक्ष ठेवण्यात आले होते.

या लसीचा प्रभाव व्यक्‍तीवर दोन वर्षे कायम राहील, असे सांगण्यात आले. रशियात 7.50 लाखांहून अधिक लोक कोरोना संक्रमणाने प्रभावित झालेले असून, हा जगात चौथ्या क्रमांकाचा आकडा आहे.
‘क्रेमलिन’कडून मोघम इन्कार

पुतीन यांना लस टोचण्यात आली अथवा नाही, यासंदर्भात गॅमालिया इन्स्टिट्यूटच्या प्रेस विभागाशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र, रशियन राष्ट्राध्यक्ष कार्यालय क्रेमलिनचे प्रवक्‍ते दिमित्री पेस्कोव्ह यांना पत्रकारांनी एका कॉन्फरन्स कॉलच्या वेळी हा प्रश्‍न विचारला असता, त्यांनी या चर्चेचा मोघम शब्दांत इन्कार केला. ‘एक अप्रमाणित लस देशाच्या प्रमुख नेत्यास दिली जाण्याची कल्पना निश्‍चितच चांगली नाही. ही लस आणखी कुणाकुणाला देण्यात आली, त्याचीही आपणास माहिती नाही,’ असे ते म्हणाले. मे महिन्यात पेस्कोव्ह यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यातून ते बरे झाले होते.

उद्योगपती, बडे राजकीय नेते, उच्चपदस्थ अधिकार्‍यांचा समावेश

‘ब्लूमबर्ग’च्या दाव्यानुसार, युनायटेड रसेल यासारख्या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसह उद्योगांत काम करणार्‍या बड्या व्यक्‍ती, वरिष्ठ शासकीय अधिकारी, उद्योगपती, राजकीय नेते यांना एप्रिल महिन्यातच ही लस देण्यात आली होती. मात्र, त्यांची नावे गुप्‍त ठेवण्यात आली आहेत.

 "