Mon, Jan 18, 2021 15:40होमपेज › None › ब्रावो! रवींद्र जडेजा २१ व्या शतकातील सर्वात मौल्यवान खेळाडू

ब्रावो! रवींद्र जडेजा २१ व्या शतकातील सर्वात मौल्यवान खेळाडू

Last Updated: Jul 01 2020 6:40PM
लंडन : पुढारी ऑनलाईन 

भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला २१ व्या शतकातील सर्वात मौल्यवान खेळाडू म्हणून निवडले गेले आहे. क्रिकेटचा धर्मग्रंथ विस्डेनने याची घोषणा केली आहे. तसेच श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनला जगातील सर्वाधिक किमतीच्या खेळाडूचा दर्जा दिला आहे. त्याच्यानंतर टीम इंडियाच्या जडेजाचा दुसरा क्रमांक लागतो आहे. क्रिझविझ रेटिंगच्या आधारे विस्डेनने ही निवड केली आहे.

रविंद्र जडेजाने २०१२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होती. त्याने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रात शानदार प्रदर्शन केले आहे. तिसर्‍या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ, चौथ्या क्रमांकावर ग्लेन मॅकग्रा आणि पाचव्या क्रमांकावर द. आफ्रिकेच्या शॉन पोलॅक यांचा समावेश आहे.

क्रिकविझच्या फ्रेडी विल्डे यांनी विस्डेनला सांगितले की, ३१ वर्षीय अष्टपैलू रविंद्र जडेजाची गोलंदाजीतील सरासरी २४.६२ आहे, जी शेन वॉर्नपेक्षा (२५.४१) चांगली आहे. त्याचवेळी फलंदाजीतील धावांची ३५.२६ आहे, जी शेन वॉटसनच्या ३५.१९ च्या सरासरीपेक्षा सरस आहे. जडेजाच्या फलंदाजी आणि गोलंदाजीच्या सरासरीदरम्यानचा फरक १०.६४ आहे, जो शतकातील दुसरा सर्वोत्कृष्ट आहे. 

फ्रेडी विल्डे म्हणाले की, जडेजा हा भारताचा पहिला क्रमांकाचा खेळाडू आहे. या फिरकीपटूचा खेळ पाहून कोणालाही अचंबित होऊ शकतो. फ्रंटलाइन गोलंदाज म्हणून संघात त्याची निवड होते. तसेच फलंदाजीमध्ये तो सहाव्या क्रमांकावर मैदानात उतरतो आहे. सामन्यात त्याची भूमिका खूप महत्वाची असते. 

सर्वात कमी टेस्टमध्ये २०० बळी घेणारा पहिला डावखुरा गोलंदाज...

फिरकीपटू रविंद्र जडेजा हा सर्वात  कमी म्हणजे ४४ कसोटी सामन्यात २०० बळी घेणारा पहिला डावखुरा गोलंदाज आहे. गेल्या वर्षी त्याने हा पराक्रम केला होता. त्याआधी श्रीलंकेच्या रंगाना हेरथने ४७ कसोटींमध्ये २०० बळी घेतले होते. रविचंद्रन अश्विननंतर तो सर्वात कमी कसोटी सामन्यात २०० बळी घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज आहे. अश्विनने ही कामगिरी ३७ कसोटी सामन्यांमध्ये केली. जागतिक स्तरावरील हा विक्रम पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज यासिर शाह (३३ कसोटी सामने)च्या नावावर आहे.

जडेजाच्या नावावर ४९ कसोटींमध्ये २१३ बळी आणि १८६९ धावा 

जडेजाने ४९ कसोटी सामन्यात २१३ आणि १६५ एकदिवसीय सामन्यात १८७ बळी घेतले आहेत. या सामन्यात जडेजाने १८६९ आणि २२९६ धावा केल्या आहेत. ४९ टी २० मध्ये त्याने ३९ बळी व १७३ धावा केल्या आहेत. आयपीएलबद्दल सांगायचे तर जडेजाने लीगच्या १७० सामन्यात १०८ विकेट्स घेत १९२७ धावा केल्या आहेत.