होमपेज › None › 'भारताचा महत्त्वाचा खेळाडू होण्यास उत्सुक'

'भारताचा महत्त्वाचा खेळाडू होण्यास उत्सुक'

Published On: Aug 14 2019 8:40PM | Last Updated: Aug 14 2019 8:40PM
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्या हा क्रिकेटच्या सर्व प्रारूपात खेळू इच्छितो. वेस्ट इंडिजविरुद्ध नुकत्याच झालेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत कृणालने ‘मालिकावीर’चा पुरस्कार पटकावला होता. कृणाल म्हणतो की, मला केवळ एकच प्रारूपात अव्वल बनावयाचे नसून, क्रिकेटच्या तिन्ही प्रारूपांत भारताचा महत्त्वाचा खेळाडू बनावयाचे आहे.

आयपीएलचा विद्यमान विजेत्या मुंबई इंडियन्सचा अत्यंत महत्त्वाचा खेळाडू हार्दिकचा कृणाल हा भाऊ आहे. मला एकाच प्रारूपातील अव्वल खेळाडू बनावयाचे नसून, तिन्ही प्रारूपांतील महत्त्वाचा खेळाडू व्हावयाचे आहे, असे त्याने म्हटले आहे. कृणाल म्हणाला, वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेमुळे माझ्यात आत्मविश्‍वास निर्माण झाला आहे. माझ्यासाठी या हंगामातील ही पहिली मालिका होती. याशिवाय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंसमोर चांगली कामगिरी करणे नेहमीच महत्त्वाचे ठरते. गेल्या वर्षी मी ‘अ’ संघातून एकदिवसीय सामने खेळले असून यामुळे माझ्यातील आत्मविश्‍वास वाढण्यास मदत मिळाली. 

पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धा होणार असून, यामध्ये कृणालची खेळण्याची इच्छा आहे. यासंदर्भात बोलताना मला वर्ल्डकपमध्ये खेळावयाचे आहे. मात्र, तत्पूर्वी होणार्‍या मालिकांमध्ये संघातील स्थान निश्‍चित करावयाचे आहे. जर मी या मालिकांमध्ये चांगली कामगिरी करू शकलो तर टी-20 वर्ल्डकप खेळण्याचे माझे लक्ष्य पूर्ण होऊ शकेल. 

कृणाल हा हार्दिक पंड्याचा मोठा भाऊ आहे. आपल्या लहान भावाने पहिल्यांदा टीम इंडियात स्थान मिळविल्याबद्दल कृणालला अभिमान वाटतो. यासंदर्भात कृणाल म्हणतो की, हार्दिकला जे काही मिळाले ते त्याच्या कठोर परिश्रमाचे फळ आहे. आम्ही दोघेही एकमेकांच्या यशाचा आनंद लुटत असतो. आम्ही एकमेकांची तुलना कधीच करीत नाही. कारण, दोघांचा प्रवास वेगवेगळा आहे. यामध्ये जो यशस्वी होतो, त्याबद्दल दुसरा खूश होतो. दरम्यान, कृणाल सध्या आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघातून खेळतो.