Wed, Jul 08, 2020 04:43होमपेज › None › छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे

छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे

Last Updated: Feb 19 2020 1:18AM
गणेशकुमार वि. खोडके 
(अभिलेखाधिकारी, कोल्हापूर)

शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज सर्वसामान्यांच्या मनामनावर शेकडो वर्षे अधिराज्य गाजविलेले आदरयुक्‍त व्यक्‍तिमत्त्व. शेकडो वर्षांच्या यवनी गुलामगिरीच्या जोखडातून महाराष्ट्राच्या भूमीला स्वातंत्र्याची नवीन पहाट दाखविली ती शककर्ते शिवाजी महाराज यांनी. शिवाजी महाराजांचे चरित्र अभ्यासायचे झाल्यास शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले गड-कोट दुर्ग, वास्तू, शिवकालीन वस्तू, नाणी, शस्त्रास्त्रे, शिलालेख इत्यादी गोष्टींचा आधार आपल्याला होत असतो. त्याचप्रमाणे शिवकालीन कागदपत्रेदेखील यामध्ये मोलाची भूमिका बजावत आहेत.  शिवाजी महाराजांची कारकीर्द उण्यापुर्‍या 30-35 वर्षांची आहे; पण इतक्या कमी कालावधीत महाराजांनी उभारलेले स्वराज्याचे कार्य खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. दुर्दैवाने शिवाजी महाराजांच्या इतिहासावर, त्यांच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकणारी सरासरी 240 पत्रेच आजपर्यंत उजेडात आलेली आहेत. या कागदपत्रांतूनच आपल्याला शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास करावा लागतो. शिवाजी महाराजांची ही 240 पत्रेही महाराष्ट्रात विविध ठिकाणी विखुरलेली पाहावयास मिळतात. काही खासगी घराणी, संशोधन मंडळे, त्याचबरोबर शासनाचे पुराभिलेख संचालनालय व त्यांची विभागीय कार्यालये, काही इतिहास अभ्यासक यांच्याकडेही शिवाजी महाराजांची कागदपत्रे आपणास पाहावयास मिळतात. इतिहास अभ्यासकांनी वेळोवेळी या कागदपत्रांचा शोध घेऊन त्यांचा अभ्यास करून शिवकालीन इतिहासामध्ये मोलाची भर टाकण्याचे काम यापूर्वीही केले आहे व आजही करत आहेत. शिवाजी महाराजांच्या या 240 कागदपत्रांपैकी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुराभिलेख संचालनालय या विभागाकडे त्यांचे मुख्य कार्यालय व विभागीय कार्यालय पुणे व कोल्हापूर यांच्याकडे शिवाजी महाराजांची अस्सल कागदपत्रे व्यवस्थितरीत्या जतन करून ठेवण्यात आलेली आहेत.

पुराभिलेख संचालनालयाचे विभागीय कार्यालय असणारे कोल्हापूर पुरालेखागार या कार्यालयात कोल्हापूर संस्थानच्या स्थापनेपासून म्हणजेच इ.स. 1710 ते कोल्हापूर संस्थान हे स्वतंत्र भारतात विलीन होईपर्यंतची म्हणजेच 1 मार्च 1949 पर्यंतची अस्सल कागदपत्रे जतन करून ठेवण्यात आलेली आहेत. या कागदपत्रांची संख्या सुमारे सव्वा कोटींच्या आसपास आहे. या सव्वा कोटी कागदपत्रांपैकी कोल्हापूर पुरालेखागाराचे महत्त्व अधोरेखित करणारी शककर्ते शिवाजी महाराजांची दहा अस्सल पत्रे आपणास या कार्यालयात पाहावयास मिळतात. शिवाजी महाराजांची एवढ्या संख्येने एकत्रित कागदपत्रे एकाच ठिकाणी अन्य कोठेही पाहावयास मिळत नाहीत, हे कोल्हापूर पुरालेखागाराचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. या दहा पत्रांमधील सर्वात जुने पत्र शिवाजी महाराजांनी निळोपंत मुजुमदार यांना लिहिलेले नोव्हेंबर सन 1660 चे पत्र आहे. या पत्राचा मजकूर म्हणजे माहुलीपासून भीमगडापर्यंत व इंदापूर, पुणे, चाकण या जुन्या वतनाचा कारभार निळोपंत मुजुमदार यांनी पाहावा, अशा आशयाचे हे पत्र आहे. या पत्रावर महाराजांची मर्यादेय विराजते ही मोर्तब मुद्रा उमटवलेली पाहावयास मिळते.

दुसरे पत्र डिसेंबर 1660 चे आहे. या पत्राचा मजकूर “पुणे, इंदापूर, चाकण, सुपे, बारामती येथील हिंदू-मुसलमान लोकांचे इनाम अफजलखानाच्या स्वारीअगोदर ज्याप्रमाणे चालत होते त्याचप्रमाणे पुढे चालू ठेवावे, अशा आशयाचे शिवाजी महाराजांचे हे पत्र आहे. या पत्रावरदेखील शिवाजी महाराजांची मोर्तब मुद्रा आहे. या दोन्ही पत्रांचे विश्‍लेषण केले असता अफजलखानाच्या 1659 च्या स्वारीनंतरची ही पत्रे आहेत. अफजलखानाचा खात्मा केल्यानंतर विजापूरच्या आदिलशहाच्या अखत्यारीतील पुणे, इंदापूर, चाकण, सुपे, बारामती हा प्रदेश महाराजांनी स्वराज्यात सामील करून घेतला. या प्रदेशाची जबाबदारी निळोपंत मुजुमदार यांच्याकडे महाराजांनी सोपवली व या प्रदेशात असणारी हिंदू-मुसलमान लोकांची इनामे अफजलखानाच्या स्वारीअगोदर ज्याप्रमाणे चालत होती त्याचप्रमाणे ती पुढेही सुरू ठेवण्याबाबतचा आदेश शिवाजी महाराजांनी दिलेला होता. 

तिसरे पत्र एप्रिल 1663 या काळातील आहे. या पत्राचा मजकूर सिंहगडावर फितवा झाल्याची बातमी आल्याने मोरो त्रिमल पेशवे व निळो सोनदेव मुजुमदार यांनी सैन्य बरोबर घेऊन सिंहगडावर जाण्याबाबत महाराजांचे हे पत्र आहे. या पत्रावरदेखील शेवटी महाराजांची मर्यादेय विराजते ही मोर्तब मुद्रा उमटवण्यात आलेली आहे. चौथे पत्र मार्च 1671 या कालावधीतील आहे. या पत्राचा मजकूर बाबाजी सावंत, चिंतामणी देवाल व कुणबिणी देवाल यांना सरंजामी दिल्याबाबतच्या आशयाचे हे पत्र आहे. या पत्रावर शेवटी महाराजांची मोर्तब मुद्रा मर्यादेय विराजते ही उमटवण्यात आलेली आहे. पाचवे पत्र इ.स. 1671-1679 या कालावधीतील आहे. स्वराज्याचे प्रमुख शत्रू मोघल होते. यांच्याशी कोणत्याही प्रसंगी युद्धाचा प्रसंग निर्माण होऊ शकत होता. या युद्धप्रसंगामुळे स्वराज्याच्या खजिन्यावर ताण पडू नये म्हणून शिवाजी महाराजांनी स्वतंत्र युद्धफंड म्हणून तब्बल एक लाख पंचवीस हजार होनांची तरतूद करून ठेवल्याबाबतचे हे पत्र आहे. सहावे पत्रदेखील 1671-1672 या कालावधीतील आहे. स्वराज्याचे प्रमुख सामर्थ्य म्हणजे गड-कोट. या गड-कोटांच्या दुरुस्तीसाठी व नवीन बांधकामासाठी महाराजांनी तब्बल एक लाख पंचाहत्तर हजार होनांची तरतूद करून ठेवल्याबाबतचे हे पत्र आहे.

या पत्रामध्ये किल्‍ले रायगडावरील नवीन बांधकामे करण्यासाठी सुमारे पन्‍नास हजार होन, त्याचबरोबर स्वराज्यातील प्रमुख असणारे सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, प्रतापगड, पुरंदर, राजगड, प्रचंडगड ऊर्फ तोरणा, सुधागड, लोहगड, सबलगड, श्रीवर्धनगड व मनरंजन, कोरोगड सारसगड, महीधरगड, मनोहरगड व कोल्हापूर जिल्ह्यातील दोन महत्त्वाचे किल्‍ले प्रसिद्धगड ऊर्फ रांगणा व विशाळगड या किल्ल्यांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असणार्‍या रकमेची तरतूद करून ठेवल्याचे शिवाजी महाराजांचे हे पत्र आहे. या दोन्ही पत्रांचे वैशिष्ट्य म्हणजे या दोन्ही पत्रांच्या वरील बाजूस शिवाजी महाराजांची प्रतिप्पचंद्र ही अष्टकोणी मुद्रा उमटवण्यात आलेली आहे व शेवटी मर्यादेय विराजते ही मोर्तब मुद्रा उमटवण्यात आलेली आहे. सातवे पत्र जुलै 1677 चे आहे. या पत्रात तिमाजी नारायण याला कोट वालगुडानूर येथे लिहिण्याच्या कामावर नेमल्याबाबत व त्याच्या पगाराबाबत यशवंतराव शहाजी कदम यांना लिहिलेले शिवाजी महाराजांचे पत्र आहे. या पत्राच्या डाव्या बाजूला अष्टप्रधान मंडळातील त्रिंबक मोरेश्‍वर यांची मुद्रा व शेवटी शिवाजी महाराजांची मर्यादेय विराजते ही मोर्तब मुद्रा उमटवण्यात आलेली आहे.

आठवे पत्र जुलै 1677 या कालावधीतील आहे. या पत्रात केदारजी जाधव बिन फिरंगोजी हवालदार यांना कोट उटळूर येथील तैनाती सरंजामी करून दिल्याबाबतचे शिवाजी महाराजांचे हे पत्र आहे. या पत्रावरदेखील डाव्या बाजूला अष्टप्रधान मंडळातील त्रिंबक मोरेश्‍वर यांची मुद्रा व शेवटी शिवाजी महाराजांची मर्यादेय विराजते ही मोर्तब मुद्रा उमटवण्यात आलेली आहे.

नववे पत्र जुलै 1677 या कालावधीतील आहे. या पत्रात नागोजी भोसले मुद्राधारी यांना कोट उटळूर येथील सरंजामी तैनाती नेमून दिल्याबाबत कृष्णाजी सूर्यवंशी यांना सरनोबती व सोनजी रायाजी चव्हाण यांना नाईकी दिल्याबाबतचे शिवाजी महाराजांचे हे पत्र आहे. या पत्रावर डाव्या बाजूला त्रिंबक मोरेश्‍वर यांची मुद्रा व शेवटी मर्यादेय विराजते ही मोर्तब मुद्रा आहे. दहावे पत्र जुलै 1677 या कालावधीतील आहे. या पत्रामध्ये नागोजी भोसले मुद्राधारी कोट उटळूर यांच्याकडे आसामी व बारगीर शिपाई लोक पाठविल्याबाबतचे महाराजांचे हे पत्र आहे. या पत्रावरदेखील त्रिंबक मोरेश्‍वर यांची मुद्रा व शेवटी शिवाजी महाराजांची मर्यादेय विराजते ही मोर्तब मुद्रा उमटवलेली आहे. 

सातवे, आठवे, नववे व दहावे पत्र ही एकाच काळातील आहेत. या पत्रांचे विश्‍लेषण केले असता 6 जून 1674 रोजी शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतल्यानंतर महत्त्वाकांक्षी अशा दक्षिण दिग्विजय मोहिमेची आखणी केली व दक्षिणेतही आपले साम्राज्य प्रस्थापित केले. या नवीन साम्राज्यामधील गड-कोटांचे, तेथील प्रदेशांचे योग्य व्यवस्थापन होण्याच्या द‍ृष्टिकोनातून महाराजांनी जी महत्त्वाची उपाययोजना केली त्याबाबतची ही कागदपत्रे आहेत. या सर्व कागदपत्रांचे अवलोकन केले असता असेच निदर्शनास येते की, शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले. शेकडो वर्षांच्या गुलामगिरीच्या जोखडातून रयतेला सार्वभौम स्वराज्याचा मूलमंत्र देण्याचे महत्तम कार्य महाराजांनी केले. रयतेच्या भाजीच्या देठालाही धक्‍का लागू नये म्हणून काळजी घेणारा हा द्रष्टा राजा. खरे म्हणजे शिवचरित्रातून घेण्यासारखे आजच्या युगातही बरेच काही आहे; पण शिवचरित्र समजून घेण्यासाठी जी कागदपत्रे, दस्तऐवज आहेत यामध्ये अजूनही बराचसा इतिहास अंधारात आहे. इतिहास अभ्यासक, संशोधक, त्याचबरोबर पुराभिलेख संचालनालयातील अधिकारी, कर्मचारी या कागदरूपी अथांग सागरातून असे मोती शोधून काढण्याचे कार्य करत आहेतच; पण इतिहास लेखनाच्या क्षेत्रामध्ये अजूनही नवीन अभ्यासक तयार होणे गरजेचे आहे व अशा अभ्यासकांकडून निरपेक्ष वृत्तीने जो इतिहास घडला आहे तो खर्‍या स्वरूपात उजेडात आणण्याची अपेक्षा बाळगणे ही आजच्या काळात गरजेची आहे.