Wed, Feb 19, 2020 10:54होमपेज › None › प्रिया पुनियाची धडाकेबाज खेळी, भारताचा द. आफ्रिकेवर दणदणीत विजय

प्रिया पुनियाची धडाकेबाज खेळी, भारताचा द. आफ्रिकेवर दणदणीत विजय

Last Updated: Oct 09 2019 7:13PM
वडोदरा : पुढारी ऑनलाईन 

प्रिया पुनिया (नाबाद ७५) आणि जेमिमा रॉड्रिग्ज (नाबाद ५५) यांनी झळकावलेल्या अर्धशतकाच्या जोरावर बुधवारी भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये ८ विकेटने विजय मिळविला. या विजयासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. टी-२० मालिकेत ३-१ ने विजय मिळविल्यानंतर आता वनडेतही महिलांच्या संघाने दमदार सुरुवात केल्याचे पहायला मिळाले आहे. 

प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला भारतीय संघाने ४५.१ षटकातच तबूचा रस्ता दाखवला. भारतीय गोलंदाजांच्या अचूक मा-यापुढे द. आफ्रिकेला १६४ धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यानंतर भारतीय संघाने १६५ धावांचे आव्हान ४१.४ षटकात दोन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. 

टीम इंडियाच्या प्रिया पुनियाने १२४ चेंडूत आठ चौकारांच्या मदतीसह नाबाद ७५ धावांची विजयी खेळी केली. तिने जेमिमाच्या साथीने पहिल्या विकेटसाठी ८३ धावांची भागिदारी केली. जेमिमाने ६५ चेंडूत सात चौकारांच्या सहाय्याने ५५ धावा तडकवल्या. जेमिमा बाद झाल्यानंतर प्रियाने पुनमच्या साथीने दुस-या विकेटसाठी ४५ धावांची भागिदारी करून संघाला मजबूत स्थितीत पोहचवले. पूनमने ३८ चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने १६ धावा केल्या. मात्र तिला मोठी धावसंख्या करता आली व ती लवकर बाद झाली. त्यानंतर मैदानात उतरलेल्या मीताली राजने २४ चेंडूत एका चौकाराच्या सहाय्याने नाबाद ११ धावा केल्या व प्रिया पुनियाला चांगली साथ देत संघाला विजय मिळवून दिला. प्रिया-मितालीने तिस-या विकेटसाठी ३७ धावांची भागिदारी केली. 

तत्पूर्वी, भारतीय गोलंदजांनी जबरदस्त प्रदर्शन द. आफ्रिकेच्या फलंदाजांना एकापाठोपाठ एक तंबूचा रस्ता दाखवला. झूलन गोस्वामीने ३, शिखा पांडेने २,  पूनम यादवने २, एकता बिष्टने २ दिप्ती शर्माने १ विकेट घेतली. द. आफ्रिकेकडून मारिजेन कॅपने ६४ चेंडूत सहा चौकारांच्या सहाय्याने ५४ धावा केल्या तर, लाउरा वोल्वाटने ६२ चेंडूत पाच चौकारांच्या मदतीने ३९ व कर्णधार सून लूस हिने ४३ चेंडूत २२ धावा केल्या.