Sun, Sep 20, 2020 04:33होमपेज › None › मुंबईतील मानाचा गणपती - केशवजी नाईक चाळ

मुंबईतील मानाचा गणपती - केशवजी नाईक चाळ

Last Updated: Aug 23 2020 1:35AM

केशवजी नाईक चाळ -गणपतीलोकमान्य टिळकांचा दूरगामी विचार जपणारे मंडळ -  १२७ वर्षांची अखंड परंपरा

यंदा काेराेनामुळे डिजेचा दणदणाट, नृत्याचा धिंगाणा, उंचच उंच मूर्ती, भाविकांची गर्दी आणि ग्लमरचा तडका हे चित्र गणेशाेत्सवात पहायला मिळणार नाही. मात्र या सगळ्यात आजही सण-उत्सवांचे महत्व जाणून पारंपरिक पद्धतीने, साधेपणाने आणि मूळ उद्देश जपत गणेशाेत्सव साजरा करणारी अनेक सार्वजनिक मंडळे आहेत. यंदा तर ही मंडळे अतिशय साधेपणाने आपला उत्सव साजरा करणार आहेत. त्यापैकीच एक आहे गिरगावातील केशवजी नाईक चाळीतले मंडळ. लाेकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या या उत्सवाचा आदर्श ठेवून गणेशाेत्सव साजरा करण्याची परंपरा केशवजी नाईक चाळीने आजही जाेपासली आहे. समाजात एकी निर्माण व्हावी या उद्देशाने लाेकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी गणेशाेत्सव सार्वजनिकरित्या साजरे व्हावेत यासाठी प्रेरणा दिली. टिळकांच्या उद्देशाने प्रेरित हाेउन १८९३ साली केशवजी नाईक चाळीत सार्वजनिक गणपती उत्सवाची सुरुवात झाली. यावर्षी केशवजी नाईक चाळीतील मंडळाला १२७ वर्षे पूर्ण हाेत आहेत.

यंदा काेराेनामुळे केशवजी नाईक चाळीतल्या बाप्पा अतिशय साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. दरवर्षी १२० फुट मंडप घालण्यात येताे. परंतु यंदा मंडप ६० फुटाचा घालण्यात आला आहे. चाळीत एकूण १४८ कुटुंब वास्तव्यास आहेत. काेराेनाच्या प्रादुर्भावामुळे वर्गणीसाठी आनलाईन पैसे जमा करण्याची यंदा साेय करण्यात आली आहे. गणरायाचे आगमन दरवर्षीप्रमाणे पालखीतुनच हाेणार आहे. परंतु त्यासाठी चाळीतील फक्त ८ ते १० नागरिकच उपस्थित असणार आहेत. काेराेनाचे संक्रमण राेखण्यासाठी काेणीही गर्दी करु नये यासाठी यंदा गणरायाची सजावट म्हणून देवळाची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. जेणेकरुन काेणालाही आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मंडपात येण्याची आवश्यकता नाही तर ते आपल्या घराच्या गलरीतूनच दर्शन घेऊ शकतात अशी माहिती मंंडळाचे विश्वस्त विजय दातार यांनी दै. पुढारीशी बाेलताना सांगितली.

उत्सव साधेपणाने साजरा करताना सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा देखील रद्द करण्यात आल्याने गिरगावातील अनेक चाळींमध्ये बालगोपालांचा हिरमोड झाला आहे. गिरगावात आनंदमय वातावरण असले तरी तरुण कार्यकर्त्यांमधील उत्साह मात्र काहीसा मावळला आहे. लहान मुलांच्या स्पर्धा, महिला विशेष कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

लाेकमान्य टिळकांची केशवजी चाळीतील पहिली भेट

लाेकमान्य टिळक १९०१ साली गणेशाेत्सवादरम्यान मुंबईत एका सभेसाठी आले हाेते. त्यावेळी त्यांनी केशवजी चाळीतील बाप्पाला भेट दिली हाेती. फक्त भेटच नाही तर त्यांच्या व्याख्यानाचे देखील आयाेजन करण्यात आले हाेते. केशवजी नाईक चाळीतल्या बाप्पाला अनेक राजकीय नेत्यांनी आणि कलाकारांनी भेट दिली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे, राम शेवाळकर यांनी येथे आयाेजित व्याख्यानात मार्गदर्शनही केले आहे.

साधेपणा हेच वैशिष्ट्य

१२७ वर्षे उलटल्यानंतरही या मंडळाने गणेशाेत्सवाच्या मूळ उद्देशाची कास साेडलेली नाही. डिजेचा दणदणाट, प्रसिद्धीच्या वलयात आणि गगनात भिडलेल्या मूर्तीच्या उंचीच्या स्पर्धेत या मंडळाने आजही आपला साधेपणा जपलेला आहे. हे मंडळ गेल्या १२७ वर्षापासूुन एकाच आकाराची शाडुच्या  दाेन फुटांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करते. गणपतीचे आगमन आणि विसर्जन पालखीतून केले जाते. सर्वात महत्वाचे म्हणजे चाळीतील सर्व रहिवाशी मिरवणुकीत अनवाणीच सहभागी हाेतात.

स्वतः साेबतच आपल्या कुंटुबाची काळजी घ्या 

दहा दिवस बाप्पा आमच्या चाळीत विराजमान हाेताे. पारंपारिक पद्धतीने आम्ही गणेशाेत्सव साजरा करताे. ना डिजेचा दणदणाट ना काेणता दिखाऊपणा. प्रवचन, व्याखानमाला , किर्तन, स्थानिक कार्यक्रमांचे आयाेजन केले जाते. चाळीतील मुलांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी खास कार्यक्रम असतात. महिलांसाठी एक दिवस खास राखीव ठेवला जाताे. परंतु यंदा काेराेनामुळे सर्व कार्यकम रद्द करण्यात आले आहेत. १९९२ साली मंडळाने शताब्दी वर्ष साजरे केले. पुण्यातल्या एका अभिनेत्याने लाेकमान्य टिळकांची हुबेहुब वेशभुषा केली हाेती. लाेकमान्य टिळकांसारखे त्यांनी भाषणही दिले हाेते. या प्रसंगाबाबत सांगताना विजय दातार जुन्या आठवणींना उजाळा देतात आणि सध्या काेराेनाची साखळी ताेडण्यासाठी सर्वांनी स्वतः  साेबतच आपल्या कुटुंबाची देखील काळजी घ्या असे आवाहन त्यानी केले आहे.

- विजय दातार,विश्वस्त

यंदा साेशल मीडियावर भर

यंदा काेराेनामुळे गणेशाेत्सवाचे स्वरुप पुर्णपणे बदलले आहे. १० दिवसांमध्ये आयाेजित करण्यात येणारे सर्व स्थानिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या चाळीतील रहिवाशांची काळजी घेण्यासाठी दाेन कार्यकर्ते दर दिवशी मंडपात असणार आहेत. ते साेशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळणार आहेत. यंदा बाप्पाचे दर्शन भाविकांना घेता यावे याकरिता चाळीच्या बाहेर स्क्रीन लावण्यात येणार आहे. त्यावर फेसबुक, टिव्टिरच्या माध्यमातून लाईव्ह दर्शन दिले जाणार आहे. याशिवाय विसर्जन मिरवणुक काढणार नाहीत. बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी चाळीतच एक हाैद बांधुन त्यातच विसर्जन केले जाणार आहे. 

- अशाेक पेडणेकर, सेक्रेटरी,

 "