Sun, Sep 20, 2020 04:33होमपेज › None › गणेशउत्सव2020 -मुंबईतील मानाचा गणपती- गौड सारस्वत ब्राह्मण (जीएसबी) सेवा मंडळ

मुंबईतील मानाचा गणपती - गौड सारस्वत ब्राह्मण (जीएसबी) सेवा मंडळ

Last Updated: Aug 23 2020 1:35AM

गौड सारस्वत ब्राह्मण (जीएसबी) सेवा मंडळ गणपतीमुंबईतील सर्वात श्रीमंत बाप्पा म्हणून ओळख असलेल्या जीएसबी सेवा मंडळाच्या बाप्पाचा थाट हा दरवर्षी वेगळाच असतो. तब्बल ७० किलो सोने आणि ३५० किलो चांदीने मढलेला बाप्पा मुंबईचे मुख्य आकर्षण आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने या बाप्पाच्या दर्शनासाठी, राज्य तसेच देश विदेशातील गणेशभक्त येत असतात,  परंतु यंदा हे चित्र बघायला मिळणार नाही, मंडळाने यावर्षी ऑनलाईन दर्शन महोत्सवाचे आयोजन केले आहे.

लालबागच्या राजानंतर सर्वांत प्रसिद्धी मिळविलेला गणपती अशी किंग्ज सर्कल येथील गौड सारस्वत ब्राह्मण (जीएसबी) सेवा मंडळाच्या या बाप्पाची ख्याती आहे. जीएसबी मंडळाचे यंदाचे 66 वे वर्ष असून नवसाला पावणारा हा बाप्पा असल्याने दरवर्षी लाखो भाविक न चुकता येथे दर्शनासाठी गर्दी करतात. सेलिब्रेटी ही ह्याला अपवाद नाहीत. नवसपूर्ती झाल्यावर भक्तही मोठ्या संख्येने सोने-चांदीची आभूषणे गणरायाला अर्पण करतात.

पाच दिवसांच्या ह्या गणपती उत्सवात दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे दागिने आणि रक्कम जमा होते. सोन्या - चांदीच्या दागिन्यांनी मढलेल्या ह्या मूर्तीचे सौंदर्य डोळे दिपवणारे असते. कोरोना व्हायरसमुळे उदभवलेल्या संकटाचे सावटही या बाप्पावर आहे. हीच एकंदर परिस्थिती आणि झपाट्याने होणारा कोरोनाचा फैलाव पाहता मंडळाने गणेशोत्सव साजरा करत असताना उत्सवावर काही मर्यादा आणल्या आहेत. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत गणशोत्सव साजरा होत आहे.

दरवर्षी १४ फुट असणारी गणरायाची मुर्ती यंदा मंडपात असणार नाही. तर सरकारदरबारी मंडळाने मागणी करुनही परवानगी न मिळाल्याने चार फुट छोटी गणेशमुर्ती यंदा विराजमान होणार आहे. त्यामुळे मुर्तीवर सोन्या चांदीची आभूषणे परिधान केली जाणार नाहीत. साधेपणाने पूजा केली जाणार आहे. श्रींची मूर्ती, भव्य मंडप, दागिने, भाविकांची रेलचेल यंदा दिसणार नाही. मंडळात केवळ मर्यादीत पूजा करणार्यांची उपस्थिती, सामाजिक अंतर, मुखवटे परिधान करणे, स्वच्छता व इतर निकषांचे पालन करून हा उत्सव साजरा केला जाणार आहे.

श्री मंडपात भाविकांना दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार नाही. मंडळाचे संकेतस्थळ, फेसबुक आणि जीओ टीव्हीवर भाविकांसाठी ऑनलाइन दर्शनाची सोय केली जाणार आहे. तर, सेवेदारांना घरपोच प्रसाद वाटप करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. घरबसल्या भाविकांना दर्शनाची सोय असणार आहे. दुर्वा अर्पन करणे, अष्टनमन मंत्रावली आदी कार्यक्रम पाच दिवसाच्या काळात होणार आहेत. मंडळाच्या गणेशोत्सवाची ओळख विधायक कार्यासाठी आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जीएसबी मंडळाच्या वतीने गणेशोत्सवाला आधुनिकतेची जोड देत गणेशोत्सवानिमित्त पहिल्या ऑनलाईन दर्शनाचे आयोजन केले आहे. पहिल्या ऑनलाईन दर्शनासाठी अभिनेते, गायक, राजकीय नेते, विविध सामाजिक कार्यकर्ते आदीनी मंडळाच्या फेसबुक पेजवर ऑनलाइन दर्शनासाठी आवाहन केले असल्याची माहिती जीएसबी सेवा मंडळाचे विश्वस्त आर. जी. भट यांनी दिली.

मंडळाचे विधायक काम   

जीएसबी सेवा मंडळाकडून ठाण्यातील घोडबंदर रोड येथे सुसज्ज १०० बेडचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे पावणेदहा एकर जागेचा प्रश्न निकालात निघाला आहे. या रुग्णालयात चॅरिटेबलच्या माध्यमातून अत्यल्प दरामध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. जागेच्या परवानगी आणि शासकीय कामाची पूर्तता झाली आहे. प्रत्यक्ष रुग्णालय उभारणी आदी काम झाल्यानंतर अत्यल्प दरात सुविधा मिळणार आहेत. रुग्णालयाचा दर्जा हा खासगी रुग्णालयांसारखा चांगला असणार आहे. वैद्यकीय तंत्रज्ञान, चांगले औषधोपचार, तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार या ठिकाणी मिळणार आहेत. याबाबत जीएसबी सेवा मंडळाचे विश्वस्त आर.जी भट यांनी माहिती दिली. स्थानिक नागरिक आणि जनतेच्या सामाजिक बांधिलकीतून त्यांच्या वैद्यकीय सुविधांसाठी या रुग्णालयाचा विचार झाल्याचे ते म्हणाले.               
       
१४ लाख नागरिकांना फूड पॅकेट वाटप 
                                                                          
कोरोना महामारीत लॉकडाउनच्या कालावधीत एफ नॉर्थ विभागातील १४ लाख नागरिकांना फूड पॉकेटचे वितरण केले आहे. बंदच्या काळात कोणीही उपाशी राहू नये म्हणून हा उपक्रम सुरू केला. ज्यांना उत्पन्नाचे साधन नाही, जे गरजू आहेत अशा बेघर, गरीब, निराधार, गरजू नागरिक, विद्यार्थी, रात्र निवारातील नागरिकांना फूड पॅकेट देण्याचे काम मंडळाने केले आहे.

 

 

 "