श्री गणपतीची षोडशोपचार पूजा

Last Updated: Aug 12 2020 10:42AM
Responsive image
श्रीगणेश

आपली सर्व संकटे व विघ्ने दूर व्हावीत, त्याचप्रमाणे आरंभिलेले शुभकार्य निर्विघ्नपणे तडीस जावे, म्हणून श्री गणपतीची पूजा व आराधना करण्याची प्रथा हजारो वर्षे चालू आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी (भाद्रपद शुक्ल चतुर्थी) गणेशमूर्तीची भक्तिपूर्वक पूजा करायची असते. (स्नानादिक आटोपल्यानंतर शुचिर्भूतपणे आसनावर बसून द्विराचमन, प्राणयामादि करून देवपूजेचा भक्तिपूर्वक संकल्प करावा.)
श्री गजानन, श्री लक्ष्मीनारायण (अथवा अमूक इष्ट) देवताप्रीत्यर्थ ‘यथाज्ञानेन यथामिलितोपचारद्रव्यै: षोड्शोपचार पूजनमहं करिष्ये’ असे म्हणून पाणी सोडावे. देवपूजेस आरंभ करण्यापूर्वी कलशपूजा, शंखपूजा, घंटापूजा व दीपपूजा करावी. ‘कलशदेवताभ्यां नम: सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि’ असे म्हणून कलशावर गंधपुष्पादि वाहावे. अशीच शंख, घंटा आणि दीपपूजा करावी. यानंतर शंखातून पाणी घेऊन ‘अपवित्र: पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा। य:स्मरेत्पुण्डरीकाक्षं सबाह्मभ्यंतरं शुचि’ या मंत्राने सर्व पूजाद्रव्यांवर व आपल्या मस्तकावर ते प्रोक्षण करावे. नंतर इष्टदेवतेचा ध्यानश्लोक म्हणून आपल्या हृदयकमलात त्या मूर्तीचे ध्यान करावे. त्या भावनामय दिव्य मूर्तीस पूजेच्या प्रतिमेत स्थापण्याकरिता ‘प्राणान् आवाहनामि’ असे म्हणावे व ‘मी पूजा करेपर्यंत येथे (या मूर्तीत) स्थिर राहा’ अशी त्या देवाची मनोमन प्रार्थना करावी व अक्षता वाहाव्यात. मग ती प्रतिमा, शिला काष्ठ, मृत्तिका अथवा चित्रमय कसलीही असो, अगदी जिवंत, चिन्मय, प्रत्यक्ष आहे‘ अशी भावना करून अत्यंत आदराने पुढील सोळा उपचार मानस व प्रत्यक्ष समर्पण करावे.
1) आवाहनं समर्पयामि : बोलावणे, पूजा ग्रहण करण्याकरिता ध्यानश्लोकाने हाक मारून ‘ये ये’अशी प्रार्थना करणे व देवता येऊन मूर्तीत बसली असे मानणे. 2) आसनं समर्पयामि : बसण्याची बैठक (सुंदर सिंहासन कल्पून अक्षता वाहणे)
3) पाद्यं समर्पयामि : पाय धुण्यास पाणी देणे (तशी कल्पना करून पळीने पाणी सोडावे.) 4) अर्घ्यं समर्पयामि : हात धुण्यास पाणी देणे. 5) आचमनं समर्पयामि : चूळ भरण्यास व घोट घेण्यास पाणी देणे. 6) स्नानं समर्पयामि : अंग धुणे, अभिषेक करणे, पण यावेळी प्रथम पंचामृतस्नान घालावे. पयो-दधि-घृत-मधु-शर्करास्नानं स. गंधोदक, शुद्धोदकस्नानं समर्पयामि। यानंतर पुरुषसुक्तादिकाने अभिषेक करावा. 7) वस्त्रोपवस्त्रं समर्पयामि : नेसण्याचे व पांघरण्याचे वस्त्र (पीतांबर, शेला इ.) देऊन अलंकाराने समर्पयामि असे म्हणून अक्षता वाहाव्यात. 8) यज्ञोपवीतम समर्पयामि : जानवे (प्रत्यक्ष जानवे किंवा त्या भावनेने अक्षता) 9) गंधं समर्पयामि : चंदन (देवीला हरिद्राकुंकुम सौभाग्यद्रव्य समर्पण करावे).
10) पुष्पं समर्पयामि : नाना प्रकारची सुवासिक फुले वाहावीत. (फुलानंतर तुळशी, बेल, दुर्वा इ. त्या त्या देवतेची प्रिय पत्रे अर्पावीत) 11) धूपं समर्पयामि : सुवासिक उदबत्त्या अथवा धुपाची पूड जाळणे. 12) दीपं समर्पयामि : तुपाच्या तीन वाती पेटवून ओवाळणे. 13) नैवेद्यं समर्पयामि : षडसान्नाचे पंचपक्वान्नांचे जेवण देणे. (नैवेद्य दाखविल्यानंतर मध्ये पानीयं, उत्तरापोशनं, हस्तप्रक्षालनं, मुखप्रक्षालनं, करोद्वर्तनार्थ चंदन, तांबुलं, सुवर्णपुष्पदक्षिणा, महाफलं, महानीरांजनदीपं, समर्पयामि। म्हणजे आरत्या).
14) प्रदक्षिणा समर्पयामि : देवासमोर देवाच्या उजव्या बाजूला साष्टांग नमस्कार घालावा. 15) नमस्कारं समर्पयामि : शक्य असल्यास देवाच्या सभोवार देवाच्या उजवीकडून डावीकडे अथवा आपल्या भोवतीच फिरणे. 16) मंत्रपुष्पांजली समर्पयामि : ओंजळीत फुले घेऊन अभिमंत्रित करून देवावर उधळणे. यानंतर ‘छत्र-चामरं-गीतं-नृत्यं-वाद्यं-आंदोलनं-दर्पण-नटनाट्यवेदं-पुराणपठणं-रथजाश्वपदातीन सम सर्वराजोपचारार्थ तुलसीपत्रं अथवा अक्षतानं समर्पयामि’, असे म्हणून देवावर तुळशीपत्र किंवा अक्षता घालाव्यात आणि यथामति कृतपूजनेन भगवान (अमूक देवता) प्रीयताम्, प्रीतो भवतु, तत्सत्, श्रीकृष्णापर्णमस्तु असे म्हणून पाणी सोडावे. ‘आवाहनं नं जानमि न जानमि विसर्जनम्। पूजा चैव व जानामि क्षम्यतां परमेश्वर।’ असे म्हणून नम्रभावाने वंदन करून (मूर्तीच्या व आपल्या हृदयास स्पर्श करून) मूर्तीतल्या देवास आपल्या हृदयात परत आणून स्थापन करावे व आचमन करावे.