Wed, Sep 23, 2020 08:29होमपेज › None › ताजिकिस्तानच्या पामिर पठारावर ड्रॅगनचा दावा

ताजिकिस्तानच्या पामिर पठारावर ड्रॅगनचा दावा

Last Updated: Aug 08 2020 1:05AM
बीजिंग : वृत्तसंस्था

चीनने सगळ्या जगाला ठेंगा दाखवत आपले विस्तारवादी धोरण सुरूच ठेवले आहे. भारतातील लडाखपाठोपाठ चीनने आता मध्य आशियातील एक देश ताजिकिस्तानला धमकावले आहे. ताजिकिस्तानातील पामिरच्या पठारावर आपली (चीनची) मालकी असल्याचा दावा ड्रॅगनने केला आहे. चीनमधील सरकारी माध्यमे पामिरचा डोंगराळ भाग हा चीनचा अविभाज्य भाग असल्याचे सांगत असून, चीनने तो पूर्ववत आपल्या ताब्यात घ्यायला हवा, असे सुचवत आहेत. ताजिकिस्तान हा रशियासाठी सामरिक द‍ृष्टीने एक महत्त्वपूर्ण देश असल्याने चीनच्या या भूमिकेमुळे रशियाही सावध झाला आहे.

लडाख आणि दक्षिण चीन समुद्रात शेजारी देशांच्या जमिनींचे लचके तोडायला निघालेल्या ड्रॅगनची जीभ आता मध्य आशियातही लवलवत आहे. चीनच्या अधिकृत सरकारी माध्यमांनी तशी मोहीम सुरू केली असून, या मोहिमेमुळे अत्यंत गरीब असलेल्या या देशाच्या (ताजिकिस्तान) चिंतेत वाढ झाली आहे. चीन आणि ताजिकिस्तानने मिळून 2010 मध्ये एका करारावर मिळून स्वाक्षर्‍या केल्या होत्या. या करारानुसार पामिरमधील 1,158 चौरस किलोमीटर परिसर चीनला देण्याचा निर्णय असहाय्य ताजिकिस्तानला घ्यावा लागला होता.

चीनचे हे तंत्रच आहे. दबाव आणायचा आणि तहाच्या माध्यमातून थोडीफार जमीन पदरात पाडून घ्यायची. समोरचा दबतो, हे आधीच कळलेले असते मग नंतर त्याला आणखी दाबून मारण्याचे प्रकार चीनकडून सुरू होतात. शिवाय, चीन एखाद्या देशाच्या योजनेत भागीदारी करतो, कर्ज देतो, एखादा प्रकल्प उभा करतो, रस्ता बांधतो, हवाई तळ बांधतो आणि मग पुढे ती जमीन बळकावतो.

ताजिकिस्तानात 145 सुवर्णभंडार

चीन हा देश ताजिकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर ताशकुर्गानलगत एक विमानतळ बनवत आहे. त्यामुळे ताजिकिस्तान आधीच चिंतेत आहे. शिवाय, चीनचा डोळा ताजिकिस्तानातील सोन्याच्या खाणींवरही आहे. ताजिकिस्तानात सोन्याच्या 145 खाणी आहेत. ताजिकिस्तान सरकारने चिनी कंपन्यांना त्यांच्या विकसनाचे आणि खननाचे हक्‍क दिलेले आहेत.

रशियाचे कान टवकारले

चीनच्या सरकारी माध्यमांनी केलेल्या या दाव्यानंतर रशियाचेही कान टवकारले आहेत. मध्य आशियातील देशांकडे सामरिक द‍ृष्टीने बघण्याचा रशियाचा द‍ृष्टिकोन हे देश म्हणजे आपलाच भाग, असा आहे.
 

 "