होमपेज › None › अन् दीपिकाने जाळले ‘छपाक’चे  प्रोस्थेटिक

अन् दीपिकाने जाळले ‘छपाक’चे  प्रोस्थेटिक

Last Updated: Oct 12 2019 8:32PM
मुंबई :

समाजातील विकृतीला अनेक लोक विनाकारण बळी पडत असतात. अ‍ॅसिड हल्‍लाग्रस्त तरुणीही त्याचे उदाहरण आहेत. लक्ष्मी अग्रवाल ही तरुणीही अ‍ॅसिड हल्ल्याच्या भयावह प्रसंगातून गेली. तिच्या जीवनावर व नंतरच्या तिच्या प्रेरणादायी कार्यावर आधारित ‘छपाक’ हा चित्रपट दीपिका पदुकोण आणत आहे. या चित्रपटाची तीच निर्मातीही आहे आणि यामध्ये लक्ष्मीची भूमिकाही तिनेच साकारली आहे. या भूमिकेसाठी तिने अ‍ॅसिडमुळे बिघडलेल्या चेहर्‍याचा प्रोस्थेटिक मेकअप वापरला होता. ही भूमिका साकारत असताना तिला लक्ष्मीच्या यातनांची जाणीव झाली आणि त्याचा तिला वैयक्‍तिक जीवनातही त्रास होऊ लागला. त्यामुळे चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होताच तिने हा प्रोस्थेटिक मेकअप जाळून या भूमिकेतून स्वतःची सुटका करवून घेतली!

एका मुलाखतीत तिने सांगितले, काही कलाकार शूटिंगच्या आठवणी आपल्यासमवेत घेऊन जात असतात. मात्र, मी या भूमिकेत इतकी गुरफटले होते की, त्यामधून मुक्‍त होण्यासाठी मी तो प्रोस्थेटिक मेकअप सेटवरच जाळून टाकला. एखाद्या भूमिकेत इतके गुरफटले जाण्याचा अनुभव मला यापूर्वी आला नव्हता. त्यामुळे या भूमिकेतून सुटका करून घेण्याची माझी इच्छा होती व ती अशा माध्यमातून मी पूर्ण केली. चित्रपटात दीपिकाच्या व्यक्‍तिरेखेचे नाव मालती असे आहे. यामध्ये विक्रांत मैसी यानेही ‘अमोल’ नावाची महत्त्वाची भूमिका साकारली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन ‘राजी’ फेम मेघना गुलजार (गीतकार-दिग्दर्शक गुलजार व अभिनेत्री राखी यांची कन्या) हिने केले आहे. चित्रपटाचे शूटिंग जूनमध्ये पूर्ण झाले. त्यावेळी दीपिकाने हे प्रोस्थेटिक अल्कोहोल टाकून जाळून टाकले होते! हा चित्रपट पुढील वर्षी 10 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.