Mon, Sep 21, 2020 19:12होमपेज › None › स्पर्धा पाकिस्तानबाहेर व्हावी, किंवा काही काळ स्थगित करावी : भारत

स्पर्धा पाकिस्तानबाहेर व्हावी, किंवा काही काळ स्थगित करावी : भारत

Published On: Aug 14 2019 8:47PM | Last Updated: Aug 14 2019 8:47PM
नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भारताच्या राष्ट्रीय टेनिस महासंघाने पाकिस्तानविरुद्ध इस्लामाबाद येथे होणार्‍या डेव्हिस कप टेनिसचे सामने दोन महिन्यांपर्यंत स्थगित करण्याची मागणी केली आहे. अखिल भारतीय टेनिस संघटनेने आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने सध्याची स्थिती पाहता भारत व पाकिस्तान यांच्यातील डेव्हिस कप स्पर्धेला दोन महिन्यांपर्यंत स्थगित करण्याची विनंती केली आहे. डेव्हिस कप सामने हे 14 व 15 सप्टेंबरला इस्लामाबाद येथे होणार आहेत; पण पाकिस्तान सोबतची सध्याची परिस्थिती पाहता भारताचा सहभाग अनिश्‍चित समजला जात आहे.

डेव्हिस कप अंतर्गत भारतीय संघाला पाकिस्तानला जायचे होते. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता ते शक्य नाही. त्यामुळे ही स्पर्धा पाकिस्तान बाहेर व्हावी किंवा काही काळाकरिता स्थगित करण्यात यावी, असे भारतीय टेनिस संघटनेने आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाला लिहिले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

अखिल भारतीय टेनिस संघटनेने (एआयटीए) आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाला (आयटीएफ) स्पर्धा तटस्थ ठिकाणी करण्याची मागणी केली होती. ज्याला पाकिस्तानने नकार दिला होता. या सामन्याकरिता आम्ही तयारी करीत असल्याचे पीटीएफ प्रमुख सलीम सैफुल्लाह यांनी सांगितले आहे.

आयटीएफच्या उत्तरानंतर भारतीय टेनिस संघटना घेणार निर्णय

5 ऑगस्टला झालेल्या घोषणेनंतर निर्माण झालेली परिस्थिती आयटीएफ समजून घेत नाही. या स्थितीत आमच्या देशातील कोणताही खेळाडू पाकिस्तानला जाऊन खेळणार नाही. आम्ही त्यांच्या उत्तराची वाट पाहू व त्यानंतर निर्णय घेऊ, असे एआयटीएफचे सचिव हिरण्यमय चॅटर्जी यांनी सांगितले.