Sat, Jan 23, 2021 07:25होमपेज › None › सोन्याच्या दराची ४० हजाराकडे वाटचाल

सोन्याच्या दराची ४० हजाराकडे वाटचाल

Published On: Aug 13 2019 4:49PM | Last Updated: Aug 13 2019 4:49PM

संग्रहित छायाचित्रनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

जागतिक भांडवली बाजारातील अस्थिरता आणि सोन्याला आलेली जबरदस्त मागणी या पार्श्वभूमीवर सोन्याचे प्रति १० ग्रॅम म्हणजे तोळ्याचे दर ४० हजार रुपयांच्या समीप येऊन ठेपले आहेत. 

दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी सोन्याचे दर ३८ हजार ५०० रुपयांवर गेले. देशाच्या अन्य बाजारपेठांतही सोन्याच्या दराने ३८ हजार रुपयांची पातळी ओलांडली आहे. ज्या पद्धतीने सोन्याची मागणी वाढत आहे, ते पाहता सोन्याचे दर ४० हजार रुपयांच्या पुढे जाणार, ही आता केवळ औपचारिकता असल्याचे आर्थिक विश्लेषकांचे म्हणणे आहे. 

चालू वर्षी सोन्याच्या दरात आतापर्यंत २० टक्क्याने वाढ झाली आहे. गेल्या १२ दिवसांच्या सोन्याचे दर २ हजार ७५० रुपयांनी वाढले आहेत. १ ऑगस्ट रोजी सोन्याचा प्रति १० ग्रॅमचा दर ३५ हजार ७१० रुपये इतका होता. हा दर आता २ हजार ७५० रुपयांनी वाढून  ३८ हजार ४७० रुपयांवर गेला आहे. 

जगातील अनेक देशांत सध्या राजकीय संकट आहे. याशिवाय अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धाने जागतिक अर्थव्यवस्था ढवळून निघाली आहे. अलीकडेच अमेरिकेने चिनी वस्तूंवर १० टक्के इतका अतिरिक्त कर लादला आहे. चीनने चलन युद्ध आरंभले असल्याचा आरोपदेखील अमेरिकेने केला आहे. 

चिनसोबत कोणत्याही वाटाघाटी केल्या जाणार नाहीत, असे संकेत अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत. दोन महासत्तादरम्यान निर्माण झालेल्या परिस्थितीत सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची खरेदी सुरु आहे. गेल्या काही काळात जागतिक भांडवल बाजार सुस्त आहे. आर्थिक मंदीची शक्यता वर्तविण्यात येत असल्यानेही जगभरात सोन्याची खरेदी सुरू असल्याचे अर्थतज्ञाचे म्हणणे आहे.