होमपेज › National › व्हीलचेअर मागितली म्हणून वैमानिकाची प्रवाशाला जेलमध्ये पाठविण्याची धमकी!

व्हीलचेअर मागितली म्हणून वैमानिकाची प्रवाशाला जेलमध्ये पाठविण्याची धमकी!

Last Updated: Jan 15 2020 8:59AM

इंडिगो एअरलाइन्सबंगळूर : पुढारी ऑनलाईन

चेन्नई ते बंगळूर दरम्यान विमान प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशाने व्हीलचेअर मागितल्याच्या कारणावरून वैमानिकाने त्या प्रवाशाला जेलमध्ये पाठविण्याची धमकी दिल्याचा आणि त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत इंडिगो एअरलाइन्सने प्रवासाशी गैरवर्तन करणाऱ्या वैमानिकाला ड्युटीवरून हटविले आहे.

वाचा : देशभरात सहा वर्षांत तीन हजार वाघांची शिकार

एका महिला प्रवाशाने आपल्या ७५ वर्षीय आईसाठी व्हीलचेअरची मागणी केली. यामुळे वैमानिकाने महिला प्रवाशाला जेलमध्ये पाठविण्याची धमकी दिली. याबाबतची तक्रार प्रवाशाने ट्विटच्या माध्यमातून दिली.

वाचा : हिरवीगार मुंबई १० वर्षांत झाली उजाड

या प्रकरणी माहिती देताना सुप्रिया उन्नी नायर यांनी सांगितले की, मी चेन्नई येथून बंगळूरकडे जाणाऱ्या विमानातून प्रवास करत होते. आपली आई मधुमेहाची रुग्ण आहे. त्यामुळे आईसाठी मी व्हीलचेअरची मागणी केली. या कारणामुळे वैमानिकाने माझ्याशी गैरवर्तन केले आणि तुरुंगात पाठवण्याची धमकी दिली. जेव्हा बंगळूर विमानतळावर व्हीलचेअर आणण्यात आली तेव्हा देखील वैमानिकाने त्यांना विमानातून जाण्यापासून रोखले. 

या प्रकरणाची अंतर्गत चौकशी केली जात असल्याचे इंडिगो एअरलाइन्सकडून सांगण्यात आले आहे. एका प्रवाशाची तक्रार आमच्याकडे आली आहे. या प्रकरणी योग्य कारवाई केली जाईल, असे एअरलाइन्सने म्हटले आहे.

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी या प्रकरणी म्हटले आहे की, सुप्रिया यांच्याशी वैमानिकाने केलेल्या गैरवर्तनाबद्दल माहिती मिळाली आहे. आपल्या कार्यालयाशी लवकर संपर्क करण्याचे निर्देश इंडिगोला दिले आहेत. दरम्यान,  चौकशी पूर्ण होईपर्यंत सदर वैमानिकाला ड्युटीवर हटविले आहे, असे इंडिगोने म्हटले आहे.